वि.प. पोटनिवडणूक : प्रसाद लाड (भाजप) विरुद्ध दिलीप माने (कॉंग्रेस) यांच्यात लढत

टीम महाराष्ट्र देशा – विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या वतीने प्रसाद लाड, तर कॉंग्रेसकडून सोलापूरचे माजी आ. दिलीप माने यांनी उमेदवारी अर्ज भरले. त्यामुळे आता पोटनिवडणुकीत लाड विरुद्ध माने अशीच लढत होणार असल्याचे निश्चित झाले. माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे आ. नारायण राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या ७ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा आज शेवटचा दिवस होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत लाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. तर कॉंग्रेसकडूनही माने यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान रविवारी रात्री लाड यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही श्री. ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर शिवसेनेने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने लाड यांचा विजय निश्चित मानला जात आहे.