माढ्याच्या लढ्यात आता आणखी एका नेत्याची उडी ?

टीम महाराष्ट्र देशा – सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबनदादा शिंदे यांचे बंधूं संजय शिंदे यांना राष्ट्रवादी पक्षाकडून माढा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपने रणजीत सिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या लढ्यात आता आणखी एका उमेदवाराने उडी घेतली आहे.

आता धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर हेदेखील माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे संजय शिंदे, भाजपचे रणजितसिंह निंबाळकर आणि धनगर समाजाचे उत्तम जानकर या तीन नेत्यांमध्ये आता चुरशीची लढाई होण्याची शक्यता आहे.

धनगर समाजाच्या मागण्यांकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे उत्तम जानकर यांना समाजाकडून निवडणूक लढण्याचा दबाव आहे, असं सांगण्यात येत आहे.उत्तम जानकर यांनी उद्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. कार्यकर्त्यांचा जो निर्णय असेल तो मान्य करणार, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची चार लाख मते आहेत. त्यामुळे उत्तम जानकर निवडणुकीला उभे राहिल्यास नक्की कुणाला फटका बसणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही याच मतदारसंघातून  निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु काही काळानंतर त्यांनी आपण लढणार नसल्याचं जाहीर केले होते.  तर २००९ साली पवारांनी याच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली होती.