उस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून आ.दिलीप सोपलांचे नाव आघाडीवर

उस्मानाबाद: लोकसभेला बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचे नाव सध्या आघाडीवर दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील हे निवडणुकीमध्ये उतरणार नसल्याने त्यांच्याऐवजी उमदेवार कोण, याची चाचपणी सुरू आहे. त्यात दिलीप सोपल यांचे नाव वरिष्ठ पातळीवरून तगडे उमेदवार म्हणून घेतले जात असल्याची माहिती समोर येत आहे.

बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल हे 1985 पासून विविध चिन्हावर निवडून आले आहेत . ते शरद पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी आमदार, मंत्री यासह विविध समित्यांवर काम केले आहे. सोपल यांचा हा अनुभव पाहता लोकसभेसाठी त्यांचे नाव चर्चिले जात आहे.

दिलीप सोपल यांचे नातू आर्यन सोपल यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, आमदार दिलीप सोपल हे लोकसभेसाठी इच्छुक नाहीत. परंतु शरद पवार यांनी आदेश दिला तर सोपल ते निवडणूक लढवतील. त्यामुळे येणाऱ्या काळात समजेल.

Loading...

दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीकडून पद्मसिंह पाटलांच्या कुटुंबातच उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. त्याचबरोबर त्यांचावर एक गट नाराज असल्याचे कळते आहे. त्यातच डॉ. पद्मसिंह पाटील हे त्यांचे चुलत बंधू पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडात आरोपी आहेत. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. स्थानिक निवडणुकीत हा मुद्दा चर्चेचा आणि कळीचा ठरतो. त्यामुळे यावेळी पक्षाश्रेष्टी वेगळा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे.

त्यासोबतच डॉ. पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील, त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्याबरोबरच आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण यांची नावे राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत. त्यामुळे उस्मानाबाद लोकसभेसाठी राष्ट्रवादी कडून उमेदवार कोण अद्याप स्पष्ट नसले तरी, बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांचे नाव आघाडीवर आहे.

या मतदारसंघात उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, परंडा हे चार विधानसभा मतदारसंघ, तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि लातूर जिल्ह्यातील औसा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांना 6 लाख 7 हजार 699 इतकी मते मिळाली होती . तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे डॉ. पद्मसिंह पाटील यांना 3 लाख 73 हजार 374 इतकी मते मिळाली. गायकवाड हे विक्रमी दोन लाख 34 हजार 325 मतांनी विजय झाले होते.

1 Comment

Click here to post a comment