fbpx

उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याचा ‘जलशक्ती अभियानामध्ये’ समावेश करावा : खा. छत्रपती संभाजीराजे

उस्मानाबाद : महाराष्ट्रात वारंवार पडत असलेल्या दुष्काळाची परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून खा.छत्रपती संभाजीराजे यांनी उस्मानाबाद व लातुर जिल्हाचा जलशक्ती अभियानामध्ये समावेश करावा, अशी मागणी पत्राद्वारे जलशक्ती मंत्री श्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्याकडे केली आहे. तसेच यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांना छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची पुस्तके भेट दिली.

यावेळी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, योगेश केदार, उपस्थित होते. उस्मानाबाद व लातूर हे जिल्हे सर्वाधिक दुष्काळग्रस्त आहेत. महाराष्ट्रातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या सुद्धा याच दोन जिल्ह्यात होत आहेत. देशभरात कोरड्याठाक पडत चाललेल्या नद्या व दिवसेंदिवस घटत चाललेली भूजल पातळी या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी केंद्रशासन देशभरात जलपुनर्भरण योजना राबवणार आहे. त्यासाठी जलशक्ती अभियान हा पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक राज्यातील काही दुष्काळी जिल्ह्यांची या अभियानाकरीता निवड करण्यात आली आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक, बीड, पुणे, सोलापूर, नगर, सांगली, बुलढाणा, अमरावती, या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. तरी या योजनेत पाण्यावाचून सर्वाधिक वंचित असलेले उस्मानाबाद व लातूर ह्या जिल्ह्यांचा समावेश करणे गरजेचे आहे. असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.