मुस्लीम समाजाने मोदी सरकारचे आभार मानावे- शायरा बानो

नागपूर: तिहेरी तलाक च्या विरोधात मुस्लीम महिलांच्या बाजुने कायदा करणा-या केंद्रातील मोदी सरकारबद्दल मुस्लीम समाजाने आभारी असले पाहिजे असे मत मुस्लीम महिला कार्यकर्त्या शायरा बानो यांनी आज, शनिवारी नागपुरात व्यक्त केले. भारतीय स्त्री शक्ती संस्थेच्या त्रिदशक पूर्ति कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.

शहरातील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, खा. संपतिया उईके, कुमुदिनी भार्गव, डॉ. प्रभा चंद्रा प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी शायरा बानो म्हणाल्या कि, मुस्लीम जगतात गेल्या 1400 वर्षांपासून तिहेरी तलाक , हलाला आणि बहुविवाह अशा कुप्रथा आहेत. या प्रथा एकतर्फी असून त्या स्त्रियांचे स्वातंत्र्य, हक्क आणि अस्तित्व नाकारतात.

तिहेरी तलाकमुळे मुस्लीम पुरुष आपल्या पत्नीला कधीही कुठेही, एकतर्फी तलाक देऊ शकत होते. क्षुल्लक कारणांवरून फोनवर, व्हॉटस् अप्पवर ते आपल्या पत्नीला तलाक देत असत. अनेक मुस्लिमबहुल देशात कालबाह्य अशी तिहेरी तलाक पद्धत रद्ली आहे. अन्याय करणारी दृष्ट समाजिक प्रथा हद्दपार करून समाजाचे नवनिर्माण करण्याची गरज आहे. आपल्या आयुष्यातही 10 ऑक्टोबर 2015 हा दिवस असाच उगवला. माझ्या पतीने मला तिहेरी तलाक दिला होता. निकाह हलालामध्ये स्त्रिला पहिल्या पतीसोबत पुन्हा राहायचे असेल, तर आधी दुस-या व्यक्तीशी विवाह करावा लागतो. त्याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर मगच तिला पहिल्या पतीसोबत राहण्याची परवानगी मिळते.

परंतु, माझा या प्रकाराला पूर्ण विरोध होता. त्यामुळे आपण सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली. न्यायालयाने मुस्लीम महिलांच्या बाजूने ऐतिहासीक निर्णय दिला. त्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये केंद्रातील भाजप सरकारने मिहलांच्या बाजूने तिहेरी तलाकच्या विरोधात कायदा पारित केला. कायद्याचे भक्कम पाठबळ मिळाल्यामुळे मुस्लीम महिलांची बाजू बळकट झाली आहे. त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी कायदा करणा-या भाजप सरकारबद्दल मुस्लीम समाजातील महिलांनी मोदी सरकारचे आभार मानले पाहिजे असेही शायरा बानो यांनी यावेळी सांगितले.Loading…
Loading...