साराह अ‍ॅप जमा करतेय युजर्सची गोपनीय माहिती

sarahah-app

साराह अ‍ॅप वापरणार्‍यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असतांना सुरक्षेचा एक मुद्दा समोर आला असून हे अ‍ॅप युजर्सच्या कॉन्टॅक्ट लिस्टची माहिती जमा करत असल्याचे आढळून आले आहे.

साराह अ‍ॅप सध्या तुफान लोकप्रिय झाले आहे. यात अनामिक राहून आपल्या मनातील मळमळ व्यक्त करणे शक्य असल्यामुळे याचा वापर वाढला आहे. मात्र हे अ‍ॅप वापरण्यासाठी पुरेसे सुरक्षित नसल्याचा इशारा सायबरज्ज्ञांनी आधीच दिला होता. विशेष करून मध्यंतरी या अ‍ॅपची माहिती सार्वजनिक होण्याची भितीदेखील व्यक्त करण्यात आली होती. यावरून उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आता नवीन धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

साराह अ‍ॅप वापरण्याआधी संबंधीत युजरकडून त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टच्या अ‍ॅक्सेसची परवानगी मागितली जाते. यात कुणी ही परवानगी देतो तर कुणी नाकारतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही परवानगी नाकारली तरीही साराह अ‍ॅप वापरता येते. यातच हे अ‍ॅप आपल्या सर्व्हरवर त्या युजरची कॉन्टॅक्ट लिस्ट त्यांचे मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आदींच्या माहितीसह अपलोड करत असल्याचे झॅचरे ज्युलियन या सायबर सुरक्षा तज्ज्ञाला आढळून आले असून त्याने या माध्यमातून साराह अ‍ॅप गोपनीय माहिती जमा करत असल्याचे सर्वप्रथम जगाच्या निदर्शनास आणले आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे साराह अ‍ॅपची विश्‍वासार्हता धोक्यात आल्याचे पाहून याचा निर्माता जैनुलबदीन तौफीक याने आपण फाईंड युवर फ्रेंड या फिचरसाठी ही माहिती जमा करत असल्याचा दावा केला. तथापि, या प्रकारचे कोणतेही फिचर आतापर्यंत साराह अ‍ॅप वापरत नसल्याची बाब समोर आल्यामुळे या दाव्यातील दम आपोआपच निघाला आहे. यामुळे एकीकडे अनामिक राहून संदेश पाठविण्याची सुविधा द्यायचे आणि दुसरीकडे कॉन्टॅक्ट लिस्टमधील यादीची माहिती जमा करायची असा दुटप्पी प्रकार साराह अ‍ॅप करत असल्याचे उघडकीस आले आहे.