fbpx

ही आणि अशी झाडे लावू, उपयोग त्यांचा समजून घेऊ (विशेष लेख)

वनमहोत्सवाच्या निमित्ताने १ जुलै २०१६ रोजी वृक्ष लागवडीच्या कामात आबालवृद्धांनी सहभाग नोंदवला आणि वृक्ष लागवडीचा लोकोत्सव साजरा झाला. राज्यात एका दिवसात २ कोटी ८२ लाख झाडं लागली. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली.

१ जुलै ते ७ जुलै २०१७ या वनमहोत्सवाच्या कालावधीत ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प ५ कोटी ४३ लाख वृक्षलागवड होऊन पूर्णत्वाला गेला. या घटनेची नोंद देखील लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली.

हा वृक्षोत्सव साजरा करण्याची संधी तुम्हा आम्हा सर्वांना यावर्षी पुन्हा मिळत आहे. १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत आपल्या सर्वांना मिळून शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवडीत सहभागी व्हायचे आहेच पण लावलेली रोपं जगवायची देखील आहेत.

रोपं लावताना आपल्या माती चा पोत, तिथं पडणारा पाऊस आणि तिथले वातावरण या सगळ्याच गोष्टींचा विचार करून ती लावली तर ती रोपं जगण्याचं प्रमाण निश्चित वाढतं. कोणता वृक्ष कोणत्या कारणासाठी उपयुक्त ठरू शकतो, याचा देखील अभ्यास महत्त्वाचा ठरतो.. हे समजून घ्यायचं असेल तर काय करायचं? अहो, वन विभाग यासाठी आहे ना सतत तुमचा सोबती…. वन विभागाने यासंबंधीचे मार्गदर्शन करणारी पुस्तिका प्रकाशित केली आहे.

जाणून घ्या तुमच्या गावचं पर्जन्यमान… लावा तशी रोपं छान

पर्जन्यमानमातीची आवश्यक खोलीलावणी योग्य झाडे
सुमारे २५० ते ५०० मि.मी५० से.मी किंवा अधिकशिवण, शिरस, शिसू, खैर इ.
२५ से.मी ते ५० से.मीशिवण, शिरस, शिसू, खैर, कडुनिंब, चंदन, ऑस्ट्रेलियन बाभूळ इ.
२५ सें.मी हून कमी (निकृष्ट जमीन)कडुनिंब, खैर, सागवान, घायपात, इ.
सुमारे १८०० मि.मी पर्यंत२५ से.मी हून कमी (निकृष्ट जमीन)सागवान, हळदू, सावर, बिजा, बांबू इ.
१८००  मि.मि. हून अधिक व जमीनीची ऊंची समुद्र सपाटीपासून  ८०० मीटरपर्यंत असलेल्या प्रदेशात२५ सें.मी हून कमी (निकृष्ट जमीन)सुरु, कदंब, बांबू, सिल्वर ओक, सोनचाफा, सप्तपर्णी, निलगिरी

 

जमिनीच्या प्रकारानुसार लावावयाची झाडं

जमिनीचा प्रकार लागवड योग्य प्रजाती
करड्या व काळ्या रंगाची विविध पोताची जमीन सिरस, कडुनिंब, अंजन, शिसू, सुबाभूळ, भेंडी, ऑस्ट्रेलियन बाभूळ, करंज, आंबा, निलगिरी, शेवगा इ.
ट्रप दगडापासून तयार झालेली मध्यम ते खोल

चुनखडीयुक्त तपकिरी व काळ्या रंगाची जमीन

सागवान, बांबू, खैर, निलगिरी, सुबाभूळ, शिसू, सिरस, चिंच, बाभूळ, सीताफळ, आंबा इ.

सिरस, चिंच, बाभूळ, सीताफळ, आंबा इ.

रेताळ जमीनखैर, शिसू, सिरस, बकान, करंज, कडुनिंब, इ.
चिकन मातीची जमीन हिवर, बाभूळ, महारूख, सिरस, जांभूळ, अर्जुन, करंज. इ.
क्षार व आम्लयुक्त जमीनसिरस, करंज, अर्जुन, निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाभूळ, इ.
तांबूस मातीची जमीनऑस्ट्रेलियन बाभूळ, मोहा, बिजा, सागवान, अंजन, सेमल, कांचन, शिवण, काजू, इ.
रुक्ष क्षेत्र(ॲरीड क्षेत्र)बाभूळ, सिरस, कडुनिंब, शिसू, निलगिरी, सुरु, आवळा, बोर, कांचन इ.

रोप लावताना ते कोणत्या उद्देशाने लावायचे आहे हे निश्चित करून रोपाची प्रजाती निवडावी. त्या प्रजातीनुसार जागेची निवड करावी.

आपण रोप लावताना खड्डे करतो आणि रोपं लावतो.. पण रोपांसाठी खड्डे करणं ही देखील अभ्यासपूर्ण गोष्ट आहे. रोपांसाठी शास्त्रोक्त पद्धतीने खड्डे करून रोप लावल्यास ते रोप रुजण्यास निश्चित मदत होते.

असे लावावे रोप
१.५ फूट X १.५ फूट X 1.५ फूट खड्डा करावा त्या खड्ड्यातील सर्व माती आणि दगडगोटे बाजूला काढावेत. रोप खड्ड्यात ठेऊन खड्डा शेणखत आणि सुपीक मातीचे समप्रमाण ठेऊन जमिनीच्या पातळीपर्यंत पूर्ण भरून घ्यावा आणि नंतर हलक्या हाताने माती दाबून लावलेल्या रोपाला पाणी घालावे.

रोपे सहसा प्लास्टिकच्या पिशवीत असतात. अतिशय काळजीपूर्वक प्लास्टिकची पिशवी बाजूला करून मातीसह रोप अशा प्रकारे धरावे, ज्यामुळे रोपाची गळपट्टी बाजूच्या जमिनीच्या पातळीत येईल व संपूर्ण मुळ सरळ राहील ते दुमडले जाणार नाही. शक्यतोवर रोपं सकाळी किंवा संध्याकाळी लावावीत. रोपं लावल्यानंतर त्याला नियमित खत, पाणी द्यावे, त्याची नियमित निंदणी व कोळपणी करावी, रोप चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी फांद्याची प्रमाणात छाटणी करावी.

झाडं आणि त्यांचे उपयोग
इमारतीच्या लाकडासाठी-सागवान, बिजा, हळदू, शिवण, सिरस, किन्ही, ऐन (साजड), तिवस, कळस, खडसिंगी, रोहण, मोहीन, धामण, शिसम, बाभूळ, धावडा, केकड, महोगनी

चाऱ्यासाठी- बाभूळ, महारुख, पिंपळ, अरंग, चिंच, अंजन, सुबाभूळ, बोर, शेवगा, वड, खैर, बेल, चिंचवा, कडुनिंब, कचनार, उंबर, धामन, कुसुम, मुरुड शेंग, मोहिन, विलायती चिंच

गवत प्रजाती- शेडा, मोठा मारवेल, मारवेल, मुशी, डोंगरी, बेर, दिनानाथ, धामणा, गिनी, ऱ्होडस, हरळी, काळी कुसळी, फूली, पोकळ्या, फोराडी, पॅरा, घाण्या मारवेल

फळांसाठी- आंबा, चिंच, चिकू, नारळ, फणस, जांभूळ, कवठ, करवंद, सीताफळ, आवळा, तेंदू, बोर, काजू, खिरणी, विलायती चिंच, पेरु, बैल, कुसुम, चारोळी, बेहडा, हिरडा

इंधनासाठी- बाभूळ, ऑस्ट्रेलियन बाभूळ, सुबाभूळ, ग्लिसरीडीया, रान शेवरी, जंगली बदाम, महारूख, ॲकेशिया सेनेगल, कॅशिया सायमिया, अडुळसा, धावडा, विलायती चिंच, घाटबोर, प्रोसिफिसच्या प्रजाती, बोर, भिर्रा, बकान, विलायती मेहंदी, कुसुम, चिचवा, कखम, गराडी, शिसू, अंजन, हिवर, करंज, पार्कीनसोनिया

शेती अवजारे व शेतीकामासाठी- बाभूळ, सागवान, शिवण, जांभूळ, बांबू, निलगिरी, आंबा, खैर, तिवस, किनी, सेमल, धावडा, धामण

प्रदूषण नियंत्रणासाठी-
वातावरणात प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी- पिंपळ, अमलतास, सेमल, कदंब, गुलमोहर, बांबूसा वल्गॅरिस

वातावरणातील प्रदुषित कण शोषून घेण्यासाठी- उंबर, सीताफळ, जांभूळ, सप्तपर्णी, आवळा, चिंच, मोह, बेल, कडुनिंब, पुत्रंजीवा, तेंदू, आंबा, चारोळी, अमलतास, जारुळ, लेंडिया, अशोक, सेनल, पळस, गुग्गळ

वातावरणात सुगंध पसरवून हवेतील प्रदूषण थांबविण्यासाठी-बेल, अमलतास, लेमन ग्रास, बांबूसा ट्रायोनिटीस, सफेद कचनार (अमोनियाचे प्रमाण कमी करण्यासाठी)

सांडपाण्याच्या जागेत लावावयाची झाडे- बोर, चिंच, जांभूळ, साजड, अर्जुन

जैविक इंधनासाठी (बायोडिझेल) उपयुक्त झाडे- मोहा, करंज, जेट्रोफा (रान एरंडी), कडुनिंब, सिमारुबा

रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी झाडे-
यामध्ये छाया देणारे, जलद व प्रतिकूल परिस्थितीत वाढणारे तसेच वाहतुकीला अडथळा न येण्याइतके ऊंच वाढणारे वृक्ष यामध्ये वड, शिसू, कडुनिंब, आंबा, कुसुम, निलगिरी, करंज, गुलमोहर, पेल्टोफोरम, बाभूळ, अमलतास, अंजन, जॅकरांडा, विलायती चिंच, बकान, जांभूळ, चिंच, पिंपळ, बेहडा, अर्जुन यांचा समावेश होतो.

शोभेसाठी लावावयाची झाडे- यामध्ये गुलमोहर, पळस, कदंब, स्पॅथोडिया, कम्पॅन्यूलेटा, कांचन, अमलतास, कॅशीया प्रजाती, जॅकरांडा, नागचाफा, सोनचाफा, शंकासूर, पेल्टोफोरम, जारुळ, ग्लिसरिडिया, सेमल, बॉटल ब्रश, रेन ट्री, बकान, ॲकेशिया प्रजाती, बाहुनिया प्रजाती, सिल्वर ओक, सुरु, थुजा, निलगिरी, अशोक, चंदन, महोगनी, जंगली बदाम, पुत्रंजीवा

शेताच्या बांधावर लावावयाची झाडे- यामध्ये वैरणासाठीच्या झाडात अंजन, कचनार, चिंच, बकान, बाभुळ, बिजा, बोर, वड, शिरस, शिसू, सुबाभूळ, पिंपळ या झाडांचा तर कुंपणासाठी लावावयाच्या झाडात एरंड, ग्लिसरीडिया, चिल्लार, मेंदी, विलायती बाभूळ याचा समावेश होतो.

पाट आणि विहिरीजवळ लावावयाची झाडं – आंबा, बाभूळ, उंबर, रीठा, बेल, बांबू

रस्ता- रेल्वेमार्ग, कालवे यांच्या दुतर्फा लावावयाची झाडे – अशोक, आंबा, करंज, काशिद, कुसुम, चिंच, जांभुळ, निम, रेन ट्री, पिंपरी, बकुळ, मोहगणी, मोहा, वड, ‍सिरस, ‍शिसू, पेल्टोफोरम या झाडांबरोबरच सरळ ऊंच वाढणाऱ्या झाडांमध्ये अशोक, आकाशनीम, निलगिरी,सिल्व्हर ओक, सुरु या झाडांचा समावेश होतो.

धार्मिक स्थळाजवळ लावावयाची झाडे- अर्जुन, आंबा, आवळा, उंबर, कदंब, कवठ, कांचन, कवठीचाफा, पारिजातक, बकुळ, बेल, रुद्राक्ष, वड, सोनचाफा, चंदन, चिंच, नारळ, पांढराचाफा

शाळा महाविद्यालयाच्या पटांगणात लावायची झाडे- सावलीसाठी अमलतास, आंबा, निम, गुलमोहर, चिंच, वड, शिसू-बकुळ, शोभेची झाडे- बहावा, कचनार, कपोक, गुलमोहर, जॅकरांदा, पळस, पांगारा, सोनचाफा, सोमल, शेंद्री, कांचन, लाल सावर, टेबीबुया, बॅाटलब्रश, सुवासिक फुलांसाठी- पारिजातक, बकुळ, मधुकामिनी, रातराणी, सोनचाफा, सातविण, हिरवाचाफा इ.

वन विभाग जर इतकी सुंदर माहिती देत असेल तर मग आता आपलं गाव, गावाचं वातावरण, तिथलं पर्जन्यमान आपला उद्देश आणि आपली गरज ओळखून झाडं लावणं किती सोपं जाईल नाही का?

डॉ. सुरेखा मधुकर मुळे, वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती)