जिल्हाधिकारी कार्यालयातच मातीमिश्रित अवैध रेतीचा वापर?

औरंगाबाद : मागील काही दिवसापासून जिल्हाभरात अवैध रेती, मुरूम उत्खननाला ऊत आला आहे. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण मदतीने गौण खनिज तस्करांची कारवाई करण्यास गेलेल्या पथकावर हल्ला करण्यापर्यंत मुजोरी वाढली आहे. तर खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या कामावर स्थानिक ठिकाणाहूनच मातीमिश्रित अवैध वाळू आणून ती वापरण्यात येत असल्याने चर्चेला उधाण आले आहे. त्यात अधिकारी देखील यावर बोलणे टाळत असल्याने संशयाची सुई पुटपुटत असल्याची चर्चा सध्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आहे.

मागील काही दिवसापासून जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात गौण खनिज चोरी सुरु आहे. याकडे महसूल प्रशासनासोबतच पोलीस व अन्य प्रशासन कोरोनाच्या नावाखाली डोळेझाक करत असल्याचे दिसत आहे. यामुळे रेती आणि मुरूम चोरी करणाऱ्यांचे चांगलेच घावत आहे, शहराभोवती शासकीय जमिनी व तलाव आदी ठिकाणे या गौण खनिज तस्करांनी पोखरून ठेवले आहे. दिवसाढवळ्या शहरासह जिल्हयात अवैध रेती आणि मुरुमाच्या गाड्या सुरु असून या गाड्यांची साधी चौकशी देखील प्रशासनाकडून करण्यात येत नाही हे मात्र विशेष. या अवैध गौण खनिज उत्खननाला स्थानिक प्रशासनासोबतच राजकीय अर्थपूर्ण वरदहस्त असल्याने यावर कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे दिवसेंदिवस या गौण खनिज तस्करांची मुजोरी वाढत आहे. गौण खनिज तस्करांची मुजोरी एवढी वाढली आहे कि, खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या कामावर ओढ्याची मातीमिश्रित वाळू धुऊन आणून टाकण्यात आली आहे. तर बांधकामासाठी सुद्द्धा त्याच वाळूचा वापर करण्यात येत असल्याने जिल्हाधिकारी यांच्यासह गौण खनिज विभागावर सामान्य नागरिक प्रश्न उपस्थित करत आहे.

अशा प्रकारे जिल्हाधिकारी कार्यालयातच अवैध मातीमिश्रित रेतीचा बांधकामासाठी वापर होणार असेल आणि मुख्य प्रवेश द्वाराच्या शेजारीच पडलेल्या वाळूच्या ढिगाकडे जिल्हाधिकारी आणि गौण खनिज विभाग दुर्लक्ष करणार असेल तर जिल्हातील अवैध रेती उत्खननावर कशी कारवाई होणार असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहे. याविषयी जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ अतुल दौड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

IMP