…जेव्हा भाजपच्या वॉररूम मधून सामान्य नागरिकाला येतो व्हेरिफिकेशनसाठी मिसकॉल

भाजप कार्यकर्ता नसतानाही केलं जातय व्हेरिफिकेशन ?

टीम महाराष्ट्र देशा- साधारणपणे जेव्हा आपल्याला एखादा मिसकॉल येतो तेव्हा आपण कॉलबॅक करतो. पण तो मिसकॉल जर महाराष्ट्राच्या भाजपच्या वॉररूममधून आला असेल तर ? निश्चितच सामान्य माणसाच्या मनात प्रश्नांचे वादळ उठणार. चिपळूण तालुक्यातील एका सर्वसामान्य नागरिकाला अश्याच पद्धतीने आलेला मिसकॉल सध्या चर्चेत आहे.

भाजप कार्यकर्त्यांचे, बूथप्रमुखांचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी एका नागरिकाला मिसकॉल आला. त्या नागरिकाने कॉलबॅक केल्यानंतर भाजपच्या वॉररूम मधून बोलणाऱ्या महिलेशी झालेल्या संवादाचे एक कॉलरेकोर्डिंग सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.  विशेष म्हणजे नागरिकाला फोनवर बोलणारी महिला ही कधी मुख्यमंत्री वाररूम तर कधी भाजप वाररूममधून बोलत असल्याचे सांगत आहे. तसेच संबंधित नागरिक हा आपण भाजपचा कार्यकर्ता नसल्याच सांगत असतानाही त्यांना व्हेरिफिकेशन बद्दल विचारल जात आहे.

‘महाराष्ट्र देशा’ या क्लीपच्या सत्यतेची हमी घेत नाही. मात्र, सोशल मिडीयावर ही क्लिप व्हायरल झाली असून उलटसुलट चर्चा सुरु आहे.

भाजपशी कसलाही संबंध नाही अश्या व्यक्तीला कॉल अथवा मिसकॉल करणे तसेच मुख्यमंत्र्यांच्या वॉररूम मधून हा कॉल आहे, असे सांगणे गंभीर असल्याचे बोलले जात आहे. आम्ही यासंदर्भात कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचं त्यांनी सांगितले तसेच मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी देखील केली. मुख्यमंत्र्यांचे नाव वापरून अश्या पद्धतीने लोकांना भाजपकडे वळविणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

You might also like
Comments
Loading...