पकिस्तानच दहशतवाद्यांचा ‘नंदनवन’

blank
वेब टीम:- अमेरिकी परराष्ट्र खात्याने प्रकाशित केलेल्या ‘कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम’ या अहवालात पाकिस्तानचा समावेश दहशतवाद्यांच्या आश्रयदाता देशांच्या यादीत करण्यात आला आहे. २०१६ मध्ये पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दोन दहशतवादी संघटनांनी मोठय़ा प्रमाणात प्रशिक्षण शिबिरे चालवली, तसेच विविध मार्गानी निधीसंकलनही केले पाकिस्तानातील सरकारने मात्र त्याकडे सोयिस्करपणे डोळेझाक केली. तसेच पाकिस्तानने अफगाण तालिबान किंवा हक्कानी गटाविरोधात परिणामकारक कारवाई करण्यास टाळाटाळ केली, असे नमूद करत पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी नंदनवन ठरत असल्याचे अहवालात म्हटले आहे.पाकिस्तानने लष्कर-ए-तोयबावर बंदी घातली असली तरी जमात-उद-दवा आणि फलाह-इ-इन्सानियत फाऊंडेशन या संस्थांच्या माध्यमातून ही दहशतवादी संघटना आपला निधीसंकलनाचा उपक्रम राबवत असल्याचे अहवालात म्हटले आहे. लष्कर आणि जैश या दोन्ही संघटनांनी भारतविरोधी कारवाया सुरूच ठेवल्या असून २०१६ मध्ये पठाणकोट आणि उरी या ठिकाणी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांत या संघटनांचा सहभाग होता, असेही अमेरिकी अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारताने वारंवार पुरावे सादर करूनही पाकिस्तान सरकारने या संघटनांना मोकळे रान दिले ‘लष्कर’चा म्होरक्या हाफीज सईद याच्या कारवायांकडेही पाकिस्तानी सरकारने काणाडोळा केल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला आहे.   पाकिस्तानी लष्कराने तेहरीक-ए-तालिबानसारख्या संघटनांवर कारवाई केली, परंतु त्याला मर्यादित स्वरूप होते. अफगाणिस्तानातील अमेरिकी हितसंबंधांना बाधा पोहचविणाऱ्या अफगाणी तालिबान वा हक्कानी गटाविरोधातही पाकिस्तानी लष्कराने कारवाई करताना हात आखडता घेतल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. अल कायदा, आयसिस, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि दाऊद इब्राहिमची डी-कंपनी यांच्याविरोधात संयुक्तपणे लढा देण्याचा भारत आणि अमेरिकेचा निर्धार असून त्यासाठी अमेरिका सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे अहवालात म्हटले आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तानबरोबरच अफगाणिस्तान, सोमालिया, दक्षिण फिलिपाइन्स, इजिप्त, इराक, लेबनॉन, लिबिया, येमेन, कोलम्बिया आणि व्हेनेझुएला या देशांचाही समावेश आहे.त्यामुळे पकिस्तानच पितळ पुन्हा एकदा उघड पडल आहे.