उर्मिला निंबाळकरवर केला चोरीचा आरोप; पोस्ट शेअर करत सांगितला अनुभव

उर्मिला निंबाळकर

मुंबई : अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने अनेक हिंदी, मराठी मालिकेत काम केले. सध्या उर्मिला सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते. अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच तिने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत  एका हिंदी मालिकेच्या सेटवरील अनुभव शेअर केला आहे. यामध्ये तिने तिच्यावर लिपस्टिक चोरल्याचा आळ घेतला असल्याचे सांगितले आहे.

याबाबत एक पोस्ट शेअर करत म्हणाली, तर झालं असं…एका मोठ्या हिंदी मालिकेच्या सेटवर, त्या मालिकेतील हिरोईनची मेकअप आणि हेअर ड्रायरची बॅग चोरीला गेली. त्याचवेळेस पैसे साठवून मी @maccosmeticsindia ची एक लिपस्टिक विकत घेतली होती. तेवढी एकच लिपस्टिक अप्रतिम क्वालिटीची, ब्रँडेड आणि माझा ओठांना रॅश न येऊ देणारी असल्यामुळे मी प्रत्येक शुटिंगमधे ती वापरायचे. मराठी कलाकाराच्या पर डे पेक्षा मोठ्या किंमतीची लिपस्टिक माझ्या हातात दिसल्याने, माझ्यावर चोरीचा पहिला संशय घेण्यात आला. या प्रकरणात माझा काहीही संबंध नसल्याने, साहजिकच त्यांना मी माझी संपुर्ण बॅग चेक करु दिली. माझा मोठा भाऊ भारतातील सर्वात तरुण IPS अधिकारी म्हणून निवडला गेलेला असून, माझे वडिल व्याख्यान आणि प्रवचने करतात. माझ्या कुटुंबातील प्रत्येक पुरुष पिढ्यांपिढ्या शेती करत आहे.  कलेचा कसलाही वारसा नसलेल्या कुटुंबातील मी पहिलीच मुलगी आहे, जी एकटी २ बस आणि २ लोकल बदलून, मुंबईत प्रामाणिकपणे ऑडिशन पास करुन, सेटवरील एकमेव मराठी कलाकार असूनही वेगळ्या भाषेत काम करती आहे’.

पुढे ती म्हणाली, ‘बेंबीच्या देठापासून ओरडून मला त्यांना सांगायचं होतं की मी चोर नाही. त्या माझ्या सर्वात आवडत्या एकमेव लिपस्टिकमुळे माझी डायरेक्ट लायकी काढण्यात आली होती. इतकं अपमानास्पद कधीच वाटलं नव्हतं मला.
परवा @maccosmeticsindia चा मला मेल आला, आम्हाला तुमच्या मराठी युट्यूब चॅनेलवर आमचं नविन प्रॉडक्ट पहिल्यांदा लॉंच करायचंय आणि आम्ही तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रेयेचे तुम्हाला पैसे देऊ! तुम्ही तुमच्या गोड मराठी भाषेतच बोला हा त्यांचा आग्रह होता. आपल्या आवडत्या ब्रँडबरोबर काम करुन पैसे मिळवण्याचा आनंद आहेच पण माझा हा प्रवास मलाच आनंदाचा अभिमानाचा वाटतो!’, अशी एक भली मोठी पोस्ट शेअर करत तिने तिचा अनुभव सांगितला आहे. करिअरच्या सुरुवातीला ज्या कंपनीच्या लिपस्टिक चोरीचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. आज त्याच लिपस्टिक ब्रँडनं उर्मिलाला जाहिरातीसाठी विचारले  असल्याचे त्याने यातून सांगितले आहे.

शिवाय तिने संगीत सम्राट या रिअ‍ॅलिटी शोमध्ये गायक रोहित राऊत सोबत सूत्रसंचलन केलं आहे. उर्मिलाची छोट्या पडद्यावरील ‘दुहेरी’ ही मालिका चांगलीच गाजली होती. तसेच सध्या तिचे युटूबवरील अनेक व्हिडीओ चर्चेत असतात. तिच्या  व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडतात. तिच्या गोड मराठी बोलण्याची अनेकांना भुरळ पडते. तसेच तिच्या व्हिडीओचे नेहमीच कौतुक देखील केले जाते.

महत्त्वाच्या बातम्या