fbpx

बॉलीवूडचा राजकीय वावर अन् उर्मिलाचा काँग्रेस प्रवेश

मयुरी वशिंबे : लोकसभा निवडणूका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून अनेक सेलिब्रिटीदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सगळीचं  पारंपरिक समीकरणं बदलली असून प्रत्येक पक्षाकडून विरोधकाविरुध्द तगडा उमेदवार उभा करण्यासाठी सेलिब्रिटींना पक्षात खेचून आणण्याची जणू चढाओढचं सुरु झाली आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या मोठ्या कलाकाराचा पक्षप्रवेश किंवा निवडणूक लढवण्याबाबतच्या चर्चांना उधाण येत आहे.

आजवर बॉलिवूड आणि राजकारण यांचा जवळचा संबंध असल्याचं पाहायला मिळालंय. हेमा मालिनी, राज बब्बर ,शत्रुघ्न सिन्हा यांनी पूर्वीदेखील निवडणूक लढवली असून ते अनेक दिवसांपासून राजकारणात सक्रिय आहेत. पक्षाकडून जागा मिळवण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रेटींना उभं करण्याची शक्कल लढवली जातीये. आता या चर्चेत आज आणखी एक नाव सामिल होतंय, ते म्हणजे बॉलीवूडची  रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरचं.

नुकताच उर्मिलानं काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानुसार काँग्रेसनं मुंबई उत्तर मतदारसंघातून उर्मिलाला उमेदवारी जाहीर केली. उर्मिला मातोंडकरचा सामना भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात आहे. त्यामुळं मराठमोळ्या उर्मिलाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपचा गड मानला जाणा-या उत्तर – मुंबईतील ही लढाई उर्मिलासाठी सोपी नसणार आहे.

उत्तर-मुंबई मतदारसंघात गुजराती-मराठी मतांचे समीकरण जवळपास समान आहे. दोन्ही मिळून ६० टक्के मते आहेत. ४० टक्क्यांमध्ये उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदारांचा समावेश आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे राम नाईक यांचा अभिनेते गोविंदा यांनी पराभव केला होता. हा इतिहास लक्षात घेता ग्लॅमरस चेहरा दिला तर उत्तर मुंबईत चमत्कार होऊ शकतो अशी आशा काँग्रेसला आहे.

शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या संजय निरुपम यांनी २००९  मध्ये इथून निवडणूक जिंकून लोकसभा गाठली. मात्र २०१४ च्या मोदी लाटेत मात्र उत्तर मुंबई पुन्हा एकदा भाजपनं जिंकून घेतला.

यावेळी मतदारसंघात चुरस निर्माण झालीये. उर्मिलाने उत्तर मुंबईतून निवडणूक लढवल्यास कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

1 Comment

Click here to post a comment