खर्च सादर न करणे भोवले; १५६ उमेदवारांना निवडणूक लढविण्यास बंदी

टीम महाराष्ट्र देशा –  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत वेळेत खर्च सादर न केलेल्या उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांनी दणका दिला आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीतील १५६ उमेदवारांना पुढील पाच वर्षांकरता निवडणूक लढविण्यावर बंदी घालण्यात आली आहे.विहित मुदतीत खर्च सादर न केलेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. या नोटीसवर सुनावणीदरम्यान उमेदवारांना लेखी तसेच समक्ष मत मांडण्याची मुभा देण्यात आली होती. खर्च सादर न केलेल्या १७० उमेदवारांपैकी १४ उमेदवारांचे म्हणणे व त्यांनी सादर केलेले पुरावे जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राह्य धरले. त्यामुळे उर्वरित १५६ उमेदवारांवर पुढील ५ वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, निकालानंतर ३० दिवसांच्या आत उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर करणे बंधनकारक असते. विहित मुदतीमध्ये खर्च सादर न केल्यास उमेदवाराला आदेशाच्या दिनाकांपासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीकरिता सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे.