राजस्थान सरकार साजरी करणार नोटाबंदीची वर्षपूर्ती

vasundhra raje

टीम महाराष्ट्र देशा – नोटाबंदीला ८ नोव्हेंबरला वर्ष होत आहे त्यापार्श्वभूमीवर देशभरामध्ये मोदी सरकारवर टीका होत असताना ,राजस्थानचं वसुंधरा राजे सरकार ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीची वर्षपूर्ती साजरी करणार आहे. जयपूरच्या सवाई माधोसिंह स्टेडिअममध्ये यानिमित्त एक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात ५० हजार लोक एकत्रित वंदे मातरम आणि राष्ट्रगीत गाणार आहेत.

विरोधी पक्षांनी वसुंधरा राजे सरकारच्या या निर्णयाची कठोर टीका केली आहे. ‘सरकार आपली नामुष्की झाकायला अति राष्ट्रवादाला उत्तेजन देत आहे,’ असा आरोप विरोधकांनी केला आहे. वसुंधरा राजे यांच्या या निर्णयाच्या तीनच दिवस अगोदर जयपूर पालिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांनी सकाळी काम सुरू करण्यापूर्वी आणि निघताना राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् गाण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नोटाबंदी वर्षपूर्तीच्या या कार्यक्रमाचे आयोजन युवा आणि क्रीडा विभागांतर्गत असलेलं राजस्थान युथ बोर्ड करत आहे. राजस्थान युथ बोर्डाचे उपाध्यक्ष संदीप यादव यांनी सांगितलं की अशा प्रकारचे इव्हेंट युवकांमध्ये नैतिक मूल्ये रुजवतात. आरएसएसचे समर्थन असणारी हिंदू आध्यात्मिक आणि सेवा संघटनादेखील या कार्यक्रमास सहकार्य करत आहे.राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या असणार आहेत. संगीतकार कल्याणजी यांचा एक हिंदी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रमही यावेळी सादर होणार आहे. या दोन तासांच्या कार्यक्रमात एक योग सेशनही होणार आहे.