अखेर ‘तुझ्यात जीव रंगाला’चे शुटींग थांबविण्याचे आदेश

tuzyat jiv rangla

टीम महाराष्ट्र देशा-‘तुझ्यात जीव रंगाला’ या मालिकेला स्थानिक राजकारणाचा फटका बसलाय. गेल्या दीड वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातील वसगडेमध्ये या मालिकेचं चित्रीकरण अखंडीत सुरु होतं. मात्र, वसगडे ग्रामपंचायतीनं कोणताही विचार न करता तडकाफडकी या मालीकेचं चित्रकरण बंद करण्याचे आदेश दिलेत.

कलानगरी अशी कोल्हापूरची ओळख आहे. याच कोल्हापूरला ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे नवी ओळख मिळाली. या मालिकेमुळं तंत्रज्ञ, स्थानिक कलाकार आणि कामागारांच्या हाताला रोजगार निर्माण झाला.

सोबो फिल्म प्रायव्हेट लिमिटेडची निर्मीती असणाऱ्या तुझ्यात जीव रंगाला या मालिकेनं दर्शकांच्या मनावरही अधिराज्य गाजवलंय. हे सगळं सुरळीत सुरु असतानाच वसगडे ग्रामपंचायतीनं अचानक कोणतीही पुर्वकल्पना न देता २७ ऑक्टोंबरला नोटीस देऊन चित्रीकरण तातडीनं बंद करण्याचे आदेश दिलेत.

ग्रामपंचायतीनं दिलेल्या नोटीसमध्ये सोबो फिल्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं सर्व अटीचा भंग केल्याचं म्हटलयं. त्याचबरोबर मालिकेच्या चित्रीकरणामुळं स्थानिकांना त्रास होत असल्याचा उल्लेख केलाय. मात्र, हे ग्रामपंचायत निवडणुकींनंतरच का घडलं? हे अनेकांना न उलगडलेलं कोडं आहे. तर मालिकेच्या चित्रीकरणाला पुन्हा परवानगी देण्याची मागणी स्थानिक कलाकरांनी केलीय.

वसगडे गावात असणारा वाडा मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे येथील स्थानिकांना याचा त्रास होतं असल्याचं स्थानिक रहिवाशाचं म्हणणं आहे.

ग्रामस्थांचं हे म्हणण जरी रास्त असलं तरी सोबो फिल्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या निर्मात्यांशी येणाऱ्या अडचणीवर पहिल्यांदा चर्चा करुन मार्ग काढण्याची गरज होती. मात्र, तसं न घडल्यामुळं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानं यामध्ये मध्यस्थीची भूमीका घेतलीय.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या मध्यस्थीनंतर वसगडे गावच्या सरपंच आणि अन्य सदस्यांनी स्थानिकांशी चर्चा करुन यावर मार्ग काढता येईल का हे पहातो असं आश्वासन दिलयं.

वसगडेमधील ग्रामस्थांना मालिकेच्या चित्रीकरणामुळं त्रास होत होता. तर त्यांनी आधी निर्मात्यांशी चर्चा करण्याची गरज होती. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीनंतर तात्काळ आणि तडकाफडकी तुझ्यात जीव रंगला या मालिकेचं चित्रकरण रोखण्याचे आदेश दिलेत. त्यामुळेचं याला स्थानिक राजकारणाची किनार दिसून येतेय.