fbpx

ज्या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, तेथील अपूर्ण धरणासाठी निधी-गडकरी

नितीन गडकरी

टीम महाराष्ट्र देशा –येत्या दोन वर्षांत राज्यातील सिंचन क्षेत्र ४० टक्क्यांपर्यंत नेण्यात येणार असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र व गुजरात राज्यात करार झाला असून दमण गंगा, पिंजाळ, तापी, नर्मदा हे राज्यातील प्रकल्पाचे काम येत्या तीन महिन्यात सुरू होतील, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक, जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी दिली. धरणांची कामे पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून कर्ज घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

चित्तेपिंपळगाव येथील छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याच्या १७व्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, महाराष्ट्राचे सिंचन क्षेत्र केवळ १८ ते २० टक्के असून ते दोन वर्षात ४० टक्के करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसे आव्हान मी व मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सोबत घेत स्वीकारले आहे. पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत २६ प्रकल्प आतापर्यंत पूर्ण केले. आणखी ५५ प्रकल्प हाती घेतले आहेत. कॅनॉल न बांधता सर्व पाणी पाइपद्वारे पुरविले जाणार आहे. राज्यातील धरणाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यात येणार असून वेळप्रसंगी नाबार्डकडून कर्ज घेऊ. ज्या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, तेथील अपूर्ण धरणाची कामे पूर्ण करण्यासाठी पैसा देऊ, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.

पावसाचे सुमारे ७० टक्के पाणी समुद्रात वाहून जाते. ते रोखण्यासाठी गुजरात व महाराष्ट्रात करार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार, राज्यातील आणखी चार नव्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आलीआहे. समुद्रात जाणारे पाणी गोदावरी नदीत सोडण्यासाठी ठाणे येथे सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येईल. नदीजोड प्रकल्पात मराठवाड्यासाठी महत्त्वाच्या दमण गंगा, पिंजाळ तसेच तापी नर्मदा प्रकल्पाचे काम येत्या तीन महिन्यात सुरू होईल, अशी घोषणा गडकरी यांनी केली. जायकवाडी धरणात यापुढे नेहमी १०० टक्के जलसाठा राहील, सिंचनाचे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.