‘नोटबंदी’मुळे लोक खूश असते तर…..-शत्रुघ्न सिन्हा

टीम महाराष्ट्र देशा – नोटाबंदी आणि जीएसटीवरून भाजपला त्यांचेच काही नेते घेरत असल्याचे दिसत आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा याप्रकरणी एक ट्विट करत भाजप सरकारला टोला लगावला आहे. ‘एका पोस्टने मला विचारात टाकले आहे.. जर ‘नोटबंदी’मुळे लोक खूश असते तर जल्लोष सरकार नव्हे तर लोकांनी केला असता..’ हे ट्विट करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या सरकारला आत्मस्तुती थांबवण्याचा सल्ला दिला असल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे, शुक्रवारीच माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी जीएसटीची अंमलबजावणी व्यवस्थित न केल्यामुळे अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याचवेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी हे ट्विट केले आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांच्या या ट्विटला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी हे ट्विट रिट्विट केल्याचे दिसून येते. नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोदी सरकारने ८ नोव्हेंबर हा दिवस ‘काळा पैसा विरोधी दिन’ म्हणून साजरा केला होता. तर विरोधी पक्षांनी काळा दिवस पाळला होता. अनेक ठिकाणी आंदोलनं करत प्रतिकात्मक श्राद्धही घातले होते. तर भाजपकडून नोटाबंदीचे यश लोकांना सांगण्यात आले. देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता. हाच धागा पकडून शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपवर टीका केली. सुरूवातीपासूनच दोन्ही सिन्हा द्वयींनी भाजपवर टीका करण्याचे धोरण अवलंबले आहे.