खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी बांधकाम विभागाची नवी योजना

खड्ड्यांसोबतचे सेल्फी पाठवा, खड्डेमुक्त रस्ते मिळवा

टीम महाराष्ट्र देशा –  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांसोबत सेल्फी काढून राज्य सरकारच्या कामकाजाचे वाभाडे काढले होते. यानंतर सुप्रिया सुळेंनी जनतेला ‘खड्ड्यांसोबत सेल्फी’ काढण्याचे आवाहन केले होते. याला उत्तर म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘खड्डेमुक्त रस्त्यांसाठी सेल्फी’ या अभियानाची घोषणा केली आहे.

या अभियानाच्या अंतर्गत नागरिकांनी खड्ड्यांसोबतचा सेल्फी पाठवल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ते खड्डे २४ तासांमध्ये बुजवण्यात येणार आहेत.सुप्रिया सुळेंनी ‘खड्ड्यांसोबत सेल्फी’ काढण्याचे आवाहन राज्यातील लोकांना केले होते. त्यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाददेखील मिळाला होता. त्यामुळेच सार्वजनिक विभागाने याच माध्यमातून खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला आहे.

विभागाने यासाठी एक अॅप तयार केले आहे. या अॅपवर खड्ड्यांसोबतचे फोटो पाठवण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात येणार आहे. या अॅपवर खड्ड्यांसोबतचे सेल्फी पाठवल्यास, त्या सेल्फीमधील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २४ तासांमध्ये बुजवण्यात येतील. या बुजवलेल्या खड्ड्यांचे फोटो संबंधित व्यक्तीला पाठवण्यात येणार आहेत. यासोबतच तो खड्डा नेमका केव्हा बुजवण्यात आला, तो कोणत्या भागात होता, याचीही नोंद ठेवली जाणार आहे. ‘पुणे मिरर’ने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

खड्डेमुक्त रस्त्यासाठी सेल्फी हे अभियान सर्वप्रथम पुण्यात राबवले जात आहे. ५ नोव्हेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर हे अभियान राबवण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्ड्यांसोबतचे सेल्फी पाठवण्यासाठी तयार केलेले अॅप पुढील आठवड्यात लॉन्च करण्यात येणार आहे.

या अॅपवर नागरिकांनी खड्ड्यांसोबतचे फोटो पाठवल्यावर त्यांची तातडीने दुरुस्त केली जाईल. यानंतर बुजवलेल्या खड्ड्याचा फोटो संबंधित व्यक्तीसोबतच त्या भागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात येईल. यामुळे बुजवण्यात आलेल्या खड्ड्यांची नोंद प्रशासनाकडे राहणार आहे.

You might also like
Comments
Loading...