मुख्यमंत्री बदलले तरीही सत्तांतर अटळ : पृथ्वीराज चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आज महाराष्ट्र पेटला आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, मुख्यमंत्री बदलून भाजपला फायदा होणार नाही. अपयशी मुख्यमंत्री बदलला तरीही महाराष्ट्रात सत्तांतर अटळ आहे, असे राजकीय भाकित काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. सांगली महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा संयुक्त जाहीरनामा गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला यावेळी चव्हाण बोलत होते.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, प्रतीक पाटील, जयश्री पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कार्याध्यक्ष अविनाश पाटील, सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील, पद्माकर जगदाळे, प्रकाश सातपुते उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील इंजिनिअर, आर्किटेक्ट, डॉक्टर, वकील, व्यापारी, उद्योजक व विविध क्षेत्रातील मानयवरांशी चव्हाण व पाटील यांनी संवाद साधला.

नेमकं काय म्हणाले चव्हाण ?

लोकांना विकासाची मोठी स्वप्ने दाखवत सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्यातील भाजप शासनाने लोकांचा विश्वासघात केला आहे. महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे सरकार आहे. मात्र सर्व कारभार भाजपच करत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. व्यापारी, उद्योजक आर्थिक मंदीतून जात आहेत. तरुणांच्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली असती तर मराठा आरक्षणाचा प्रश्नच निर्माण झाला नसता. रोजगार नसल्याने आज मराठा तरूण रस्त्यावर उतरला आहे. महाराष्ट्र पेटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आज महाराष्ट्र पेटला आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, मुख्यमंत्री बदलून भाजपला फायदा होणार नाही. अपयशी मुख्यमंत्री बदलला तरीही महाराष्ट्रात सत्तांतर अटळ आहे.