व्हॉट्सअॅपवर नरेंद्र मोदींची खिल्ली उडविणे पत्रकारास पडले महागात

टीम महाराष्ट्र देशा – पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवणारा व्हिडीओ व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केल्याने एका स्थानिक पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेरठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. व्हिडीओ शेअर करणा-या पत्रकाराने सांगितलं आहे की, ‘व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी अच्छे दिनच्या प्रश्नावर मेंढ्यांच्या कळपाला उत्तर देताना दाखवण्यात आलं होतं, आणि या मस्करीमुळे कोणाचं काही नुकसान झालं आहे असं मला वाटत नाही’.

सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस ठाण्याचे एसएचओ अंबरेश सिंह यांनी सांगितलं आहे की, ‘अफगान सोनी नावाच्या व्यक्तीवर कलम 500 (बदनामी) आणि कलम 60 (कॉम्प्युटरशी संबंधित गुन्हा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे’. एका हिंदी वृत्तपत्रासाठी काम करत असलेल्या पत्रकार अफगाण सोनी यांनी एसएसपी मंजिल सैनी यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हिडीओ शेअर करताच, इतर सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि एसएसपींकडे यासंबंधी तक्रार करत कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर मंजिल सैनी यांच्या आदेशानुसार अफगान सोनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ग्रुपमधील इतर सदस्यांना त्यासंबंधी माहिती पुरवण्यात आली आहे.

.

You might also like
Comments
Loading...