सामान्यांना थोडासा दिलासा ; पेट्रोल प्रतिलिटर दोन, तर डिझेल एक रुपयाने स्वस्त

पेट्रोल डीझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे सरकारवर चहू बाजूने टीका होत आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने  पेट्रोल  आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. नोटाबंदी, जी.एसटी. यामुळे आधीच सामान्य जनता वैतागली आहे. त्यात पेट्रोल डीझेलचे  वाढते भाव यामुळे महागाई प्रचंड वाढत आहे. पेट्रोल व डीझेलचे दर कमी झाले तर महागाई काही प्रमाणात कमी होईल व सामान्यांना थोडासा दिलासा मिळेल.

पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. त्यानंतर राज्यभरात पेट्रोलचे दर लिटरमागे दोन रुपयांनी तर डिझेलचे दर एका रुपयाने कमी करणार असल्याची माहिती मुनगंटीवारांनी ट्विटरवरुन दिली आहे. दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने दिलेल्या गुड न्यूजमुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

इतर महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोलचे दर चढे राहण्याची शक्यता आहे. पेट्रोलवर राज्य सरकार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात 25 टक्के तर राज्यात इतर ठिकाणी 26 टक्के व्हॅट लावते. त्याशिवाय लिटरमागे 11 रुपयांचा अधिभार आकारला जातो.

डिझेलवर राज्य सरकार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात 21 टक्के तर राज्यात इतर ठिकाणी 22 टक्के व्हॅट लावते. त्याशिवाय लिटरमागे दोन रुपयांचा अधिभार आकारला जातो. पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमधून सरकारला 19 हजार कोटींपेक्षा जास्त कमाई करते.