पद्मावतीची भव्यता अनुभवता येणार थ्रीडी मध्ये

टीम महाराष्ट्र देशा-संजय लिला भन्साळी यांचा बहुचर्चित ‘पद्मावती’ हा इतिहासपट थ्रीडीमध्ये रिलीज केला जाणार आहे. त्यामुळे या चित्रपटातील भव्यता प्रेक्षकांना आणखी खिळवून ठेवले असा निर्मात्यांचा विश्वास आहे. राणी पद्मावतीच्या जीवनावर आधारित या चित्रपटात दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत असून शाहीद कपूर आणि रणवीरसिंग यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. १ डिसेंबर रोजी पद्मावतीचा थ्री डी ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

यापूर्वी पद्मावतीच्या ट्रेलरला यु ट्युबवर ५ कोटी इतके विक्रमी व्ह्युज मिळाले आहेत. त्यानंतर काही दिवसांत रिलीज करण्यात आलेले ‘गुमर’ हे गाणेही लोकप्रिय ठरले आहे. चित्तोडची प्रसिद्ध राणी पद्मावतीच्या आयुष्यावरील या चित्रपटातील दीपिका, शाहीद आणि रणवीरच्या लुकची देखील जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. दीपिका पद्मावतीच्या भूमिकेत असून तिचा पती रावल रतनसिंगची भूमिका शाहीद कपूरने केली आहे. विक्षिप्त तुर्की शासक अल्लाउद्दीन खिलजी रणवीर साकारात असून त्याच्या भयावह अवताराची देखील चर्चा आहे.

या चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा आरोपांवरून राजपूत करणी सेनेने विरोध केला आहे. अनेक वेळा या चित्रपटाच्या सेटवर तोडफोड करण्यात आली. कोल्हापूरातही या चित्रपटाच्या सेटला मार्च महिन्यात काही अज्ञात लोकांनी आग लावली होती. या सगळया प्रकारांमुळे पद्मावतीचे बजेट 200 कोटी रुपयांच्या घरात पोहोचले असून बॉलीवूडमधील महागडया चित्रपटांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.

You might also like
Comments
Loading...