fbpx

८ नोव्हेंबरला भाजपा सरकारचे श्राध्द घालणार – संजय निरुपम

sanjay-nirupam

टीम महाराष्ट्र देशा –  नोटा बंदी लागू करण्याच्या निर्णयाला ८ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या अत्यंत अघोरी निर्णयाला १ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या निर्णयाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसतर्फे संपूर्ण देशात काळा दिवस पाळण्यात येणार आहे. मुंबई काँग्रेसतर्फे सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. नोटबंदीमुळे मृत्युमुखी पडलेले निष्पाप लोकांसाठी भाजपा सरकारचे आझाद मैदानात श्राध्द घालण्यात येणार आहे. यावेळी रीतसर ब्राम्हण येऊन पिंडदान करून काही काँग्रेसचे कार्यकर्ते मुंडण करून भाजपा सरकारचे श्राध्द घालण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी सारखा अत्यंत अघोरी निर्णय जाहिर केला आणि संपूर्ण भारत देशात एकाच खळबळ उडाली. या निर्णयामुळे देशातील सर्व गरीब जनता अक्षरशः पिसली गेली. सर्व सामान्य आणि गरीब जनतेला भयंकर त्रास सहन करावा लागला. स्वतःचेच पैसे बँकेतून काढताना ११५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्याच दिवशी म्हणजेच बुधवार ८ नोव्हेंबरला सायंकाळी ८ वाजता नोटबंदीमुळे मृत्युमुखी पडलेले ११५ निष्पाप लोकांसाठी जुहू बीचवरील महात्मा गांधी पुतळ्या जवळ श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि सर्वांना मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अ.भा. काँग्रेस कमिटीचे प्रभारी मोहन प्रकाश आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत, असेही निरुपम यांनी सांगितले.

संजय निरुपम म्हणाले की, ९ नोव्हेंबर रोजी नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाचे जे आर्थिक नुकसान झालेले आहे त्यासंदर्भात नोटबंदी आणि जीएसटी…..क्या खोया ? क्या पाया ? या परिसंवादाचे आयोजन केले आहे. या परिसंवादाला मुंबईतील सर्व डायमंड, ज्वेलरी, लोखंड, केमिस्ट अशा सर्व स्तरातील व्यापारी व उद्योजक उपस्थित राहणार आहेत आणि यावेळी प्रमुख वक्ते म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सगळ्यांशी संवाद साधणार आहेत. नोटबंदी आणि जीएसटी…..क्या खोया ? क्या पाया ? हा परिसंवाद माधव बाग, पांजरापोळ, भुलेश्वर, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली.

1 Comment

Click here to post a comment