विद्यापीठाचे नाव नव्हे तर आरक्षण हवे ; शिवा संघटनेची मागणी

टीम महाराष्ट्र देशा- मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात धनगर समाज बांधवांना आरक्षणाचे आश्वासन दिले होते. त्याची अद्याप पूर्तता झाली नाही. आरक्षणाचे आश्वासन विसरून धनगर समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूर विद्यापिठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्याची घोषणा केली होती.

धनगर समाजाला विद्यापिठाचे नाव नव्हे तर आरक्षण हवे आहे. शिवाय आता सोलापूर विद्यापिठाला शिवयोगी श्री सिद्धेश्वर असे नाव देण्यात यावे या मागणीसाठी १८ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे धरणे देणार असल्याची माहिती शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

प्रा. धोंडे पुढे म्हणाले, सोलापूर विद्यापिठाचा शिवयोगी श्री सिद्धेश्वर असा नामविस्तार करण्यात यावा अशी मागणी आम्ही वेळोवेळी केली. त्या अनुषंगाने आम्ही संबंधितांना निवेदनेही दिली. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या मेळाव्यात सोलापूर विद्यापिठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नाव देण्याची घोषणा केली.

सदर घोषणचे एक अपवाद वगळता कुठेही स्वागत झाले नाही;. धनगर समाज हा आरक्षणाची मागणी करीत आहे. परंतु, राजकीय पोळी शेकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्याचे यावेळी प्रा. धोंडे यांनी स्पष्ट केले. सोलापूर विद्यापिठाला शिवयोगी श्री सिद्धेश्वर किंवा महात्मा बसवेश्वर विद्यापीठ असे नाव देण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी येत्या १८ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात संघटनेचे विदर्भातील कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होणार असून राज्याचे पदाधिकारी सहभागी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले वक्तव्य मागे घेत झालेल्या चुकीची दुरूस्ती करावी. मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू असेही यावेळी प्रा. मनोहर धोंडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अभय कल्लावार, उध्वराव गाडेकर, सुरेश पट्टेवार आदींची उपस्थिती होती.