शिवसेनेचे शिक्षण क्षेत्रात हायटेक पाऊल

टीम महाराष्ट्र देशा – गणित, विज्ञान असो किंवा इतिहास आता कुठल्याही विषयाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना एका वेबसाइटच्या माध्यमातून शिकता येणार आहे. विशेष म्हणजे कार्टून सीरिजच्या स्वरूपात हा अभ्यासक्रम तयार केला गेल्याने विद्यार्थ्यांना तो समजण्यासही सोपा जाणार आहे. www.shivsenatopscorer.com या वेबसाइटचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी अनावरण करण्यात आले. या वेबसाइटच्या माध्यमातून शिवसेनेने शिक्षण क्षेत्रात हायटेक पाऊल टाकले आहे.

www.shivsenatopscorer.com या वेबसाइटवर गेल्यानंतर तुमचे नाव, मोबाईल क्रमांक आणि इयत्ता, स्टॅण्डर्ड इत्यादी माहिती घालावी लागेल. त्यानंतर एक प्रोमो-कोड टाकावा लागेल. तो टाकल्यानंतर आणि तुमच्या मोबाईल क्रमांकावर वन टाइम पासवर्ड येईल. तो पासवर्ड घातल्यानंतर तुम्हाला हवा त्या विषयाचा अभ्यासक्रम दिसू शकेल. विद्यार्थ्यांना शिवसेना भवन आणि जवळच्या शाखेतूनही प्रोमो-कोड मिळवता येईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

डिजिटल टेक्स्टबुकच्या स्वरूपात हा अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यासाठी नवनीत गाइडबुकचाही वापर करण्यात आला आहे. सध्या आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम वेबसाइटवर उपलब्ध आहे. नववीचा अभ्यासक्रम बदलणार असल्याने तो उपलब्ध नाही, परंतु डिसेंबरपर्यंत पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.