२ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद आरटीआय मधून सत्य उघड

टीम महाराष्ट्र देशा- गेल्या काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानंही 2000 रुपयांच्या नोटांची मर्यादित छपाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळेच 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली आहे. लाइव्ह मिंटनं दिलेल्या वृत्तानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानंही 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली असून, यंदाच्या आर्थिक वर्षात त्या छापण्यात येणार नाहीत. 2 हजार रुपयांच्या नोटांवरून सरकारकडूनही वेळोवेळी स्पष्टीकरण दिलं जात आहे. तसेच 2 हजार रुपयांच्या नोटांच्या विमुद्रीकरणाची कोणतीही योजना नाही, असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं होतं.

इंडिया टुडे नेटवर्कच्या वृत्तानुसार, आरटीआय कार्यकर्त्यानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे माहिती अधिकारांतर्गत 2 हजार रुपयांच्या छपाईसंदर्भात माहिती मागवली होती. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL)कडून मिळालेल्या माहितीनुसार, 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई करण्यासाठी आरबीआयकडून कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत आम्ही फक्त 500 रुपयांच्या नोटा छापत आहोत, असंही SPMCILनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे SPMCIL 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई करत नसल्याचं उघड झालं आहे.

रा.स्व. संघाचे विचारक एस. गुरूमूर्तींनी जाहीरपणे निवेदन केले की जे लोक 2 हजारांच्या नोटा साठवून ठेवू इच्छितात, त्यांनी आताच त्याचा पुन:र्विचार केलेला बरा, याचे कारण 2 हजारांची नोट अधिक काळ चलनात राहिल, याची अजिबात शक्यता नाही.

एप्रिल महिन्यात राज्यसभेत सरकारने उत्तर दिले की २ हजाराच्या नोटेचे निश्चलनीकरण करण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. पत्रकारांनी अर्थमंत्री अरूण जेटलींना आॅगस्ट महिन्यात विचारले की २ हजारांची नोट टप्प्या टप्प्याने चलनातून बाद करण्याचा सरकारचा इरादा आहे काय? त्यावर जेटलींनी नि:संदिग्ध शब्दात उत्तर दिले की, असा कोणताही विचार सरकारच्या मनात नाही.