राहुल गांधींमुळेच माझा मुलगा पायलट झाला: निर्भयाची आई

टीम महाराष्ट्र देशा – कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. राहुल गांधीवर अनेक विनोद देखील केले जातात. पण राहुल गांधी एक राजकीय व्यक्तिमत्व असेले तरी राहुल एक संवेदनशील माणूस आहेत यांचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.

दिल्लीत २०१२ मध्ये झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाची आठवण अजूनही देशवासीयांच्या मनात ताजी आहे. पाच वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला होता. अगदी संयुक्त राष्ट्रातदेखील निर्भया प्रकरणाची चर्चा झाली होती. त्या दिवसांमध्ये अनेकजण निर्भया आणि तिच्या कुटुंबाच्या मदतीसाठी उभे राहिले. त्यामध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचादेखील समावेश होता. त्यामुळे निर्भयाच्या आईने राहुल गांधींचे आभार मानले आहेत. ‘राहुल गांधींमुळेच माझा मुलगा वैमानिक झाला,’ अशी भावना निर्भयाच्या आईने बोलून दाखवली आहे.
‘निर्भयाच्या मृत्यूमुळे आमच्यावर मोठा आघात झाला होता. आम्ही कोलमडून पडलो होतो. त्यावेळी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीदेखील मदतीसाठी पुढे सरसावले. त्यांच्यामुळेच आज माझा मुलगा सागर (नाव बदलले आहे) वैमानिक झाला,’ अशी भावना निर्भयाच्या आईने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.

‘राहुल गांधींनी सागरच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च केला. राहुल वेळोवेळी सागरला फोन करुन त्याला प्रोत्साहन द्यायचे,’ असे निर्भयाच्या आईने सांगितले.‘त्या घटनेनंतर आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. जणू काही आयुष्य संपून गेले आहे, अशी भावना वारंवार मनात निर्माण व्हायची. मात्र या परिस्थितीतही सागर अभ्यास करत होता. त्याने अजिबात लक्ष विचलित होऊ दिले नाही.

घरातील परिस्थिती अतिशय प्रतिकूल असतानाही सागरने बारावीचा अभ्यास सुरु ठेवला,’ असे निर्भयाच्या आईने मुलाखतीत म्हटले. ‘सागरला लष्करात जायचे आहे, हे राहुल गांधींना समजल्यावर त्यांनी त्याला वैमानिक प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला,’ अशी आठवण निर्भयाच्या आईने सांगितली.२०१३ मध्ये सीबीएसईची परीक्षा दिल्यानंतर सागरने रायबरेलीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विमान उड्डाण अकादमीत प्रवेश घेतला.

त्याच्या राहण्याचा, जेवणाचा, शिक्षणाचा सर्व खर्च राहुल गांधी यांनीच केला. प्रशिक्षणाच्या १८ महिन्यांच्या कालावधीत सागर निर्भया प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती फोनवरुन घ्यायचा. सध्या सागर गुरुग्राममध्ये प्रशिक्षण घेत असून लवकरच तो विमानाचे उड्डाण करेल,’ असेही निर्भयाच्या आईने सांगितले. गेल्या ५ वर्षांमध्ये राहुल गांधींसह प्रियांका गांधी-वाड्रादेखील कायम आपल्या संपर्कात होत्या, असेही त्या म्हणाल्या.