कृषी पंपांचा वीज पुरवठा तोडण्याची अन्यायकारक कारवाई तातडीने थांबवावी – राष्ट्रवादी काँग्रेस

टीम महाराष्ट्र देशा – महावितरणने शेतक-यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची चालू केलेली अन्यायकारक मोहिम तातडीने थांबविण्याची मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.या मागणीचे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांना देवून गंभीर बनत चाललेल्या या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.तसेच कृषीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास जिल्हाभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

मागील पाच वर्षापासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करत आहे.चालू वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून यामुळे शेतकरी आनंदात आहे.परतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्याने पिकांचे नुकसान झाले.परिणामी खरीप पीक वाया गेला.परंतू शेतक-यांनी न डगमगता रब्बी हंगामच्या पीकांची तयारी केली आहे.अशा परिस्थितीत महावितरण विभागाकडून थकित कृषीपंपाच्या वीज बीलाची पठाणी वसुली करण्यात येत आहे.महावितरणने वीजबिल वसुलीसाठी रोहीत्राचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहिम जिल्ह्यात सुरु केली आहे.यामुळे शेतक-यांची रब्बी हंगामातील पीके धोक्यात येवून शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

खरीप हंगाम वाया गेला असताना शेतकरी अडचणीत सापडला असून महावितरण विभागाने शेतक-यांच्या कृषीपंपाची वीज कट करण्याच्या मोहिमेमुळे पुन्हा शेतक-यांवर सुलतानी संकट घोंगावत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. मुळातच महावितरण कडून कृषीपंपाचे वीजबिल वेळेवर मिळत नाही.परिणामी वीजबिल थकित होते.वसुलीकरिता जाचक अटी घालण्यात आल्या आहेत.खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीतून सावरत असून शेतकर्यांकडे वीजबिल भरण्यासाठी सध्या पुरेसे पैसे उपलब्ध नसल्याने वीजबिल भरणे कठिण झाले आहे.

महावितरणने कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकर्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शेतक-यांच्या विहीर,कुपनलिकेत पाणी उपलब्ध असून देखील वीजेअभावी शेतीचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.तरी महावितरणने शेतक-यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहिम त्वरीत थांबविण्याची व ज्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित केला आहे. तेथे वीजपुरवठा तातडीने सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

Loading...