फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीत कल्याण-डोंबिवलीकरांच्या समस्येवर चर्चा

टीम महाराष्ट्र देशा-मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीकराच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. यावेळी डोंबिवलीतील ‘कलेक्टर लँड’च्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकरांसोबत संपर्क साधत नजराणा शुल्क संदर्भातील अडचणी सोडवण्यास पुढाकार घ्या, असे जिल्हाधिका-यांना सांगितले.

शिवाय स्टार्टअप इंडियामध्ये कल्याण-डोंबिवलीतील युवकांच्या समस्या ऐकून त्यादेखील मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. पाच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांचा कल्याण-डोंबिवली दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कल्याण-डोंबिवलीतील काही प्रतिष्ठीत नागरिकांसोबत बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत डोंबिवलीच्या काही ज्येष्ठ नागरिकांनी, वास्तू विशारदांनी कलेक्टर लँडचा मुद्दा उपस्थित करून त्याबाबबतीतल्या अडचणी सांगितल्या होत्या तसेच काही तरुणांनी व्यवसाय उभा करताना इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात येणाऱ्या अडचणी बाबतचा फरक उदाहरणांसह दाखवून दिला होता. या दोन्ही समस्या सोडविण्यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.