मोदी एक सेल्फी क्लिक करेपर्यंत चीन मध्ये एका तरुणाला नोकरी मिळते- राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा- गुजरातमध्ये राजकीय वातारवण तापण्यास सुरुवात झाली आहे. गुजरात निवडणुकीत भाजपला करंट लागणार आहे असा टोला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला आहे. भरुच येथे झालेल्या सभेदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टिकास्त्र सोडलं.

वर्ल्ड बँकेच्या क्रमवारीत भारताची स्थिती सुधारण्यावरुन राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना टोला लगावत म्हटलं की, मोदींच्या एका सेल्फीमुळे चीनमधील एका तरुणाला नोकरी मिळते. राहुल गांधी यांनी ‘मेक इन इंडिया’वरही टीका केली असून, भारतीय तरुणांना रोजगार मिळत नसल्याचं म्हटलं आहे.

राहुल गांधी बोलले आहेत की, ‘चीनसोबत स्पर्धा सुरु असतानाही देशात मेड इन चायना सुरु आहे. आपल्या मोबाइवरुन मोदी जेव्हा सेल्फी घेण्यासाठी बटण दाबतात, तेव्हा चीनमधील एका तरुणाला नोकरी मिळते. चीनमध्ये दररोज 50 हजार तरुणांना रोजगार दिला जात आहे. मात्र नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडियामध्ये दिवसाला फक्त 450 तरुणांना रोजगार मिळतो. संपुर्ण वर्षभरात भाजपा सरकार फक्त एक लाख तरुणांना रोजगार देऊ शकलं आहे. हेच सत्य आहे, आणि हेच भाजपाचं विकास मॉडेल आहे’.