व्ही. शांताराम यांना गुगल डूडलची मानवंदना

v shanta ram google

टीम महाराष्ट्र देशा-  भारतीय चित्रपटसृष्टीला ‘दो आँखें बारह हाथ’, ‘डॉ. कोटनीस की अमर कहाणी’, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘सेहरा’, ‘गीत गाया पथरों ने’, ‘नवरंग’, ‘जल बीन मछली नृत्य बीन बिजली’, ‘चानी’, ‘पिंजरा’, ‘झुंज’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’ आदी दर्जेदार हिंदी-मराठी चित्रपट देणारे भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह, प्रसिद्ध चित्रपती व्ही. शांताराम यांची आज ११६ वी जयंती. त्यांच्या जयंती निमित्ताने गुगलने खास डूडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे.

गुगलने तयार केलेल्या डूडलमध्ये चित्रतपस्वी व्ही. शांताराम यांचा फोटो दाखविण्यात आला आहे. त्यांच्या फोटोसमोरच सिनेमाची रिळं आणि कॅमेरा दाखविण्यात आला असून बाजुला हातात डफ घेतलेला शाहीर, ‘दो आँखे बारा हाथ’ आणि ‘नवरंग’ या सिनेमातील चित्र रेखाटली आहेत. १९ नोव्हेंबर १९०१ साली कोल्हापुरात जन्मलेल्या शांताराम बापूंनी निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून चौफेर कामगिरी बजावली. दिग्दर्शक म्हणून अनेक नवीन संकल्पना त्यांनी पहिल्यांदा भारतीय चित्रपटसृष्टीत वापरल्या. सुमारे सहा दशकं ते चित्रपटसृष्टीत कार्यरत होते.

बापूंच्या कारकिर्दीला सुरुवात झाली ती कोल्हापुरातील बाबुराव पेंटर यांच्या मालकीच्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’पासून. कंपनीत पडेल ते काम करता करता १९२१ साली निर्माण झालेल्या ‘सुरेखा हरण’ या मूकपटात छोटीशी भूमिका केली. येथून त्यांची घोडदौड सुरू झाली. चित्रपट निर्मितीचं मर्म आत्मसात करीत ते पुढे जात राहिले. १९२५ साली निर्माण झालेल्या ‘सावकारी पाश’ या सामाजिक चित्रपटात त्यांनी एका तरुण शेतकर्‍याची भूमिका केली आणि १९२७ साली त्यांनी ‘नेताजी पालकर’ हा पहिला मूकपट दिग्दर्शित केला. व्ही. शांताराम प्रभात चित्र फिल्म कंपनीमधून बाहेर पडल्यावर त्यांनी परेल येथे महात्मा गांधी रुग्णालयाजवळ राजकमल स्टुडिओची उभारणी केली. वडील राजाराम व आई कमल या दोघांच्या नावातून व्ही. शांताराम यांनी स्टु़डिओला ‘राजकमल’ असे नाव दिले. राजकमलने निर्माण केलेला पहिला चित्रपट ‘शकुंतला’ होता. १९६० सालापर्यंत प्रामुख्याने येथे राजकमलच्याच चित्रपटांचे चित्रिकरण होत असे. मात्र, त्यानंतर इतरही निर्मिती संस्थांना येथे चित्रिकरणाची संधी मिळाली.