पुण्यात अज्ञातानं जाळल्या 8 दुचाकी

टीम महाराष्ट्र देशा – सदाशिव पेठेतील टिळक रोडजवळील परिसरात लावण्यात आलेल्या 8 दुचाकी अज्ञातानं आग लावून जाळून टाकल्याची घटना समोर आली आहे. ही शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. टिळक रोडवरील महाराष्ट्र मंडळसमोरील गल्लीत एल.आय.सी. कर्मचा-यांची इमारत आहे. इमारती खालील फूटपाथ परिसरात दुचाकी लावण्यात आल्या होत्या. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञातानं दुचाकींना आग लावली.
धुराच्या लोटांमुळे इमारतीतील लोकांना जाग आली व हा प्रकार उघडकीस आला. यानंतर तातडीनं अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत या दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, वैयक्तिक कारणावरून धडा शिकविण्याच्या वादातून घराबाहेर, सोसायटीबाहेर लावलेल्या दुचाकी पेटून देण्याचे प्रकार शहरात मोठया प्रमाणात वाढले आहे. अशा गुन्ह्याचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान आहे.