राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपसोबत कधीही तडजोड करणार नाही- प्रफुल्ल पटेल

टीम महाराष्ट्र देशा –  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी सतत अपप्रचार केला जातो. पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंध जोडले जातात. पण त्यात तथ्य नाही. राष्ट्रवादी पक्ष विचारधारेशी तडजोड करणारा नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपसोबत कधीही तडजोड करणार नाही, अशी भूमिका पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केली.

१९९९ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस हा आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू होता. त्या निवडणुकीनंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी पवार यांना बोलावून राज्यात शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण पक्षाने विचारधारेशी तडजोड केली नाही. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत येथे आयोजित केलेल्या पक्षाच्या चिंतन शिबीरात ते बोलत होते.

शिवसेनेने राज्यातील भाजप सरकारचा पाठींबा काढून घेतला तर राष्ट्रवादी बाहेरून पाठींबा देऊ शकते असे तर्क राजकीय वर्तुळात मांडले जात होते. पण ती जागा राष्ट्रवादी भरून काढणार नाही असे नमूद करून पटेल यांनी भाजपसोबत राष्ट्रवादी जाणार असल्याची शक्‍यता फेटाळून लावली.

आगामी लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणूकही एकत्र घेण्याचा निर्णय भाजप सरकार घेऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची दिशा निश्‍चित करून पक्षाने कामाला लागले पाहिजे, असे शरद पवार यांचे मत असल्याने ही चिंतन बैठक आयोजित केल्याचेही पटेल यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात मनता बॅनर्जी मुंबईत आल्या होत्या. त्या शरद पवार यांनाही भेटण्यास इच्छूक होत्या. त्यांनी पवार यांना भेटण्याबाबत विचारणा केली होती, असेही प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले.