पोटनिवडणुकीच्या आधी मंत्रिमंडळात समावेश व्हावा – राणे

Narayan-Rane.

टीम महाराष्ट्र देशा – मंत्रिमंडळ प्रवेशाचे आश्वासन देऊनही प्रवेश लांबणीवर पडत असल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे अस्वस्थ झाले आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या आधी मंत्रिमंडळात समावेश व्हावा, अशी त्यांची भूमिका असून, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ते चर्चा करणार आहेत.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात चर्चा केली. मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर करण्यात येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. राणे यांनी राजीनामा दिलेल्या विधान परिषदेच्या रिक्तजागेकरिता ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होत आहे.

ही पोटनिवडणूक लढविण्यापूर्वी आपला मंत्रिमंडळात समावेश व्हावा, अशी राणे यांची भूमिका आहे. गेल्या महिन्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी झालेल्या भेटीत मंत्रिमंडळ समावेशाची अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली होती. तेव्हा त्यांना तसा शब्द देण्यात आला होता.