आधी उमेदवारांची अनामत रक्कम वाचविण्याची चिंता करा मग देशाची

आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना सल्ला

टीम महाराष्ट्र देशा – गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना- भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. आदित्य ठाकरे यांनी भाजपवर सडकून ठिका केली होती. आता भाजपकडून देखील सेनेला तोडीस- तोड प्रतिउत्तर देण्यात आले आहे.

शिवसेनेने मोठय़ा उत्साहात गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार उभे केले असले तरी शिवसेनेच्या उमेदवारांची अनामत रक्कम वाचविण्याची चिंता आदित्य ठाकरे यांनी प्रथम करावी, मग देश कसा चालला आहे यावर बोलावे असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच शेकडो खासदार सध्या गुजरातच्या निवडणूक प्रचारात गुंतले आहेत, मग देश कोण चालवतंय’, असा सवाल युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच गुजरात प्रारूप दाखवून देश जिंकला असला तरी ते प्रत्यक्षात विकासाचे प्रारून नव्हते तर ‘जाहिरातींचे राजकीय प्रारूप होते’ अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली होती..