महाराष्ट्राला महान बनविण्यासाठी आश्रित परप्रांतीयांची गरज नाही- नितीन सरदेसाई

nitin sardesai mns vs cm

टीम महाराष्ट्र देशा – ‘मुंबई आणि महाराष्ट्र यापूर्वीही महान होता, आहे आणि राहील. महाराष्ट्राला महान बनविण्यासाठी आश्रित म्हणून येणाऱ्या परप्रांतीयांची गरज नाही,’ असं मनसेनं मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे. मुंबईला महान बनविण्यात परप्रांतीयांचा वाटा आहे, असं वक्तव्य  काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल होत त्या पार्श्वभूमीवर  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं  फडणवीसांवर जोरदार तोफ डागली आहे.

‘महाराष्ट्र परप्रांतीयांमुळं महान होतोय, हे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं हास्यास्पद आहे. परप्रांतातील लोक महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी येतात. त्यांच्या राज्यात विकास न झाल्यामुळं ते येतात. आश्रित म्हणून येणारे हे लोक मुंबई, महाराष्ट्राला महान कसं बनवू शकतात,’ असा सवाल मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

मुख्यमंत्र्यांची ही भूमिका म्हणजे परप्रांतीयांच्या मतांसाठी आहे. दुसरं-तिसरं काही नाही. यापूर्वी हे काँग्रेस करत होती. आता भाजप करतेय. ‘पार्टी विथ द डिफरन्स’ वगैरे काही नाही,’ असं सरदेसाई म्हणाले. ‘सत्तेत असलेले लोक त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडत नाहीत म्हणून मनसेला मराठी माणसाचा, मराठी भाषेचा मुद्दा उचलावा लागतो,’ असं ते म्हणाले. मनसेवर भाषिक वाद निर्माण करण्याच्या होत असलेल्या आरोपांचाही त्यांनी समाचार घेतला.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...