खळ खट्याक मनसेची फेरीवाल्यांविरोधात गांधीगिरी

टीम महाराष्ट्र देशा –  राज्यात मनसे आणी फेरीवाले यांच्यात सुरु असलेला वाद सगळीकडेच चर्चेचा विषय बनला आहे. मात्र बोईसरमधील रस्त्यांना अनधिकृत फेरीवाल्यांपासून मोकळा श्वास घेता यावा, यासाठी मनसेने कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. चर्चेचा मार्ग निवडत मनसेने एकप्रकारे गांधीगिरीचा मार्ग अवलंबला आहे. मनसेच्या कुंदन संखे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

फेरीवाले मुक्त व्हावे यासाठी पालघरमधील मनसेच्या नेत्यांनी बोइसरमधील ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी बोईसरवासियांशी चर्चा करत हे रस्ते फेरीवाले मुक्त कसे होतील, या संदर्भात मनसेच्या वतीने जनतेशी संवाद साधला. शिवाय, फेरीवाल्यांना पर्यायी व्यवस्था काय करावी, या विषयी बोईसरवासियांचं मत जाणून घेतलं.

राज्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे बोईसर शहर झपाट्याने वाढत आहे. परिसरातील आठ ग्रामपंचायतींमध्ये पसरलेल्या या औद्योगिक वसाहतींमुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. तसेच फेरीवाल्यांकडून रस्त्या शेजारील जागा अडवणूक केली जात असल्याने पादचार्यांना मोठी अडचण होते.

प्रशासनाकडून या सर्व समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे. त्यामुळे मनसेने आयोजित केलेल्या चर्चासत्राला नागरिकांनी मोठी गर्दी करत चांगला प्रतिसाद दिला.

दरम्यान, एका आठवड्यात हे रस्ते फेरीवाले मुक्त झाले नाही तर आम्हाला हात सोडावे लागतील, असा इशारा मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी दिला.

You might also like
Comments
Loading...