ऊसदराचे श्रेय शेट्टींनी लाटू नये – हसन मुश्रीफ

टीम महाराष्ट्र देशा – यंदाच्या हंगामात उसाच्या पहिल्या उचलीसाठी एफआरपी कायद्यानुसार ३००० रुपयांचा दर मिळणे अपेक्षित होता. त्याचे श्रेय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी घेऊ नये. शेतकऱ्यांच्यासाठी झटणाऱ्या नेत्याला आमचा पाठिंबा आहे, मात्र पहिल्या उचलेचा दर कोणाच्याही आंदोलनाने मिळालेला नाही’, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी लगाविला. केडीसीसी बँकेत शुक्रवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘शेतकरी संघटनेने आंदोलन केल्यामुळे उसाला दर मिळालेला नाही. हंगाम सुरू झाल्याने साखर कारखाने सुरू झाले. कोणत्याही संघटनेने केलेल्या मागणीला बळ दिलेले नाही. कुंभी, कासारी, गुरुदत्त सहकारी साखर कारखाना, बिद्री, शाहू सहकारी साखर कारखान्यांना सरासरी २८०० ते ३१०० रुपयांपर्यंत पहिली उचल जाहीर केली आहे. त्यामुळे प्रत्येक सहकारी साखर कारखाना हा सरासरी तीन हजार रुपये दर देणारच होता. त्याचे श्रेय खासदार राजू शेट्टी यांनी घेऊ नये. किमान दर मिळण्याचे निवेदन यापूर्वीही दिले होते. मंत्री समितीच्या बैठकीतही मागणी केली होती. दुसरी आणि तिसरी उचल किती द्यावी, हा त्या-त्या साखर कारखान्याचा निर्णय आहे.’