काँग्रेसच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाणांची वर्णी ?

सोनिया गांधींकडून हिरवा कंदील!

टीम महाराष्ट्र देशा – कॉंग्रेसमध्ये लवकरच अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका होणार असून. अध्यक्षपदी राहुल गांधीची वर्णी लागणार असून राहुल यांच्या  निवडीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कॉंग्रसचे अध्यक्ष राहुल होणार असले तर उपाध्यक्ष कोण होणार यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राहुल यांच्याकडून अध्यक्ष म्हणून काँग्रेसजनांना बऱ्याच अपेक्षा आहेत आणि ही कामगिरी बजावताना त्यांना अतिशय विश्वासू अशा सहकाऱ्यांची गरज आहे. ही गरज ओळखून सोनिया यांनी पृथ्वीराज यांचे नाव निश्चित केल्याचे समजते.

राहुल गांधी यांच्या मदतीला सोनिया गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची उपाध्यक्ष म्हणून निवड जवळपास निश्चित केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री असताना पृथ्वीराज यांनी मनमोहन आणि सोनिया गांधी यांच्यातील समन्वयाची महत्त्वाची भूमिका निभावली होती. राष्ट्रीय राजकारणाचा बऱ्याच वर्षांचा अनुभव असल्याने त्यांची राहुल यांना मदत होऊ शकते, अशी सोनिया यांची अपेक्षा असल्याचे बोलले जाते.

काँग्रेसने दिलेली जबाबदारी पृथ्वीराज यांनी पारदर्शी आणि प्रामाणिकपणे केली आहे. याचमुळे त्यांना आदर्श घोटाळ्यानंतर स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून दिल्लीतून थेट महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठविण्यात आले होते. सोनिया यांच्या या निर्णयाला राहुल यांचा पाठिंबा होता. राहुल गांधी हे अध्यक्ष झाल्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

धोरणात्मक निर्णय फार काळजीपूर्वक घ्यावे लागणार आहेत. दरम्यान, याबाबत आता पृथ्वीराज चव्हाण काय भूमिका घेतात याकडे राज्यातील राजकारण्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, याबाबत काँग्रेसच्या वतीने कुणाचाही प्रतिक्रिया आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.