कोणी निवडणूक लढो अथवा न लढो आम्ही आमचा उमेदवार उभा करणारच – अशोक चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा – विधानपरिषदेच्या ७ डिसेंबर रोजी रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे उमेदवार देणार आहे. भाजपने कोणाला उमेदवारी द्यावी, हा त्यांचा प्रश्न आहे. त्या पक्षाने नारायण राणे यांना उमेदवारी दिली किंवा नाही दिली तरी आम्ही सहमतीने उमेदवार देऊन त्याच्या विजयासाठी प्रयत्न करु, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.

नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक होणार आहे. त्या जागेसाठी भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून नारायण राणे यांना उमेदवारी मिळण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांची मंगळवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली, त्यानंतर चव्हाण बोलत होते.

उमेदवारी अर्ज भरण्याची २९ नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे, तोपर्यंत आमचा सहमतीचा उमेदवार जाहीर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. विधिमंडळाचे नागपूर येथे ११ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. भाजप सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी देता आलेली नाही. शेतकर्यांच्या आत्महत्या सुरूच असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी १२ डिसेंबरला नागपूर अधिवेधनावर संयुक्त मोर्चा काढणार असल्याची माहीतीही चव्हाण यांनी दिली.

राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, शरद रणपिसे तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, जयंत पाटील या बैठकीला उपस्थित होते.