हा आहे देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष

टीम महाराष्ट्र देशा – भारतातील प्रादेशिक पक्ष आणि त्यांचा त्यांच्या राज्यातील प्रभाव हा नेहमीच  चर्चेचा विषय असतो. अनेक प्रादेशिक पक्षाच्या सत्ता देखील त्यांच्या राज्यात आहेत. राज्याची अस्मिता जपण्यासाठी प्रादेशिक पक्ष नेहमीच पुढे असतात.  त्यांच्या या प्रादेशिक अस्मितेचा मुद्द्यामुळे त्यांना अनेक देणग्या देखील मिळतात आणि हेच पक्ष श्रीमंत होतात.

तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) देशातील ४७ प्रादेशिक राजकीय पक्षांमध्ये, सर्वांत श्रीमंत पक्ष ठरला आहे. आर्थिक वर्ष २०१५-१६ दरम्यान त्यांच्याकडे ७७.६३ कोटी रूपयांची देणगी प्राप्त झाली होती.

तामिळनाडूमध्ये द्रमुक प्रमुख विरोधी पक्ष आहे. तर सत्ताधारी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना ५४.९३ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) प्रादेशिक पक्षांच्या उत्पन्नाचे विश्लेषण करून एक अहवाल सादर केला आहे, त्यात हा दावा करण्यात आला आहे.
तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी पक्ष तेलुगु देशम पार्टी (टीडीपी) आहे. त्यांचे २०१५-१६ मधील एकूण उत्पन्न हे १५.९७ कोटी रूपये इतके होते.

उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, बिहारमधील राष्ट्रीय जनता दलासहित जेकेएनसी, आयएनएलडी, एआययूडीएफ, एजेएसयू, एमजीपीनेही आपले विवरण पत्र सादर केलेले नाही.

एडीआरच्या मते, या वर्षी ४७ पैकी ३२ प्रादेशिक पक्षांनी आपल्या उत्पन्न आणि खर्चाची माहिती निवडणूक आयोगाकडे सोपवली होती.