अनिकेत कोथळे हत्या; २५ नोव्हेंबरला सर्वपक्षीय कृती समितीचा मोर्चा

Aniket Kothale Murder News

टीम महाराष्ट्र देशा – . अनिकेत कोथळे हत्येप्रकरणी पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांची तातडीने बदली करावी, सांगली शहर पोलिस उपअधिक्षक डॉ. दीपाली काळे यांच्यावर कडक कारवाई करावी व या खून खटल्याकामी विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. उज्ज्वल निकम यांची तात्काळ नियुक्ती करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने शनिवार दि. २५ नोव्हेंबर रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

ही माहिती सर्वपक्षीय कृती समितीचे मुख्य निमंत्रक स्वाभिमानी विकास आघाडीचे सहसचिव सतीश साखळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते महेश खराडे, सामाजिक कार्यकर्ते आशिष कोरी, माजी नगरसेवक विक्रम वाघमोडे व ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे सांगली महापालिका क्षेत्र अध्यक्ष युसुफ यांनी दिली. सर्वपक्षीय कृती समितीच्या या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यासह सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यात यापूर्वी अनेक कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक यांनी काम केलेले आहे. त्यात शहिद अशोक कामटे, व्यंकटचलम, तुकाराम चव्हाण, कृष्ण प्रकाश, दिलीप सावंत व मिलिंद भारंबे यांच्या नावाचा उल्लेख प्रामुख्याने करावाच लागेल.

या पोलिस अधिकार्‍यांच्या कार्यकर्तृत्वामुळे प्रत्येक कठीण वेळेत सांगलीकर जनता त्यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली होती. मात्र सध्याचे पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांची सुरूवातच वादग्रस्त ठरलेली आहे. त्यांच्या कारकीर्दीत अनेकविध चुकीच्या घटना घडल्या आहेत व सध्या घडतही आहेत. त्यात चांदोली अभयारण्य व वारणानगर दरोडा प्रकरणामुळे सांगली जिल्हा पोलिस दलाची केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात मोठी नाचक्की झाली आहे.

सांगली शहर पोलिस ठाण्याकडील अधिकारी- कर्मचार्‍यात अंकली (जि. कोल्हापूर) येथे झालेले गँगवॉर पोलिस दलाची प्रतिमा कायमची पुसणारे ठरले. याशिवाय अनेकविध गंभीर गुन्ह्यांचा तपासही संशयास्पद बनला आहे. अनिकेत कोथळे हत्याप्रकरण ज्या सांगली शहर पोलिस ठाण्यात घडले, त्या पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रजेवर होते. मात्र त्या पोलिस ठाण्याचा पदभार एका पोलिस उपनिरीक्षकाकडे देण्यात आला. सांगली जिल्हा पोलिस मुख्यालयात पोलिस निरीक्षक दर्जाचे अनेक अधिकारी असताना सांगली शहर पोलिस ठाण्यासह विश्रामबाग, सांगली शहर वाहतूक शाखा व मिरज शहर वाहतूक शाखा अशा प्रमुख पोलिस ठाण्याचा पदभार पोलिस उपनिरीक्षकांकडेच का दिला, हे सांगलीकरांनाच नव्हे, तर संपूर्ण सांगली जिल्हा पोलिस दलालाच एक न उलगडणारे कोडे आहे.

परिणामी विविध पोलिस ठाण्याकडील हे अधिकारी बेताल व मस्तवाल बनले. त्यातूनच अनिकेत कोथळे याची पोलिस ठाण्यातच हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्यापर्यंत युवराज कामटे याच्यासारख्या पोलिस अधिकार्‍याची मजल गेली. संपूर्ण देशात कधीही जी घटना घडली नाही, ती सांगली शहरात घडली. या घटनेमुळे विविध क्षेत्रात नावलौकिकप्राप्त सांगली जिल्हा कायमचा कलंकित झाला आहे. केवळ दत्तात्रय शिंदे यांच्या चुकीमुळेच सांगली जिल्ह्याची बेअब्रू झाली आहे. दत्तात्रय शिंदे यांना पोलिस अधिक्षकपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही.

त्यामुळे दत्तात्रय शिंदे यांची तातडीने बदली करण्यात यावी, या मागणीवर सर्वपक्षीय कृती समिती ठाम आहे. या मागणीसाठीच सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी सांगली जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. जे नेते येतील, तेही या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे सांगलीकरांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही सतीश साखळकर, महेश खराडे, आशिष कोरी, विक्रम वाघमोडे व युसुफ मेस्त्री यांनी केले आहे

.अनिकेत कोथळे हत्या प्रकरणानंतर सांगली पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या कार्यपध्दतीबाबत सांगलीकर जनतेतून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. दत्तात्रय शिंदे यांच्या अत्यंत आवडीच्या सायकलिंग या विषयाबाबतही उलटसुलट चर्चा होत आहे. पुरे सायकलिंग… करा आता पोलिसिंग या आशयाची उपहासात्मक प्रतिक्रिया सर्वसामान्य सांगलीकरांतून व्यक्त होत आहे.