आ. राम कदम यांच्यावर कारवाई न झाल्यास विधानसभा चालू देणार नाही

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा; कारवाईची मागणी

मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींबाबत केलेले विधान माता-भगिनींचा अपमान आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर विधानसभेचे आगामी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.

काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि राम कदम यांच्यावर टिकेची झोड उठवली. ते म्हणाले की, राम कदम यांच्यावर कारवाई होत नाही, तोवर विधानसभेचे कामकाज न चालू देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. एकिकडे देशाचे पंतप्रधान ‘बेटी बचाओ’चा नारा देतात आणि त्यांचे आमदार मात्र ‘बेटी भगाओ’ची घोषणा करतात. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून, काँग्रेस पक्ष त्याचा तीव्र शब्दांत धिक्कार करीत असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.

दरम्यान, इंदापूर येथील सभेला प्रारंभ होण्यापूर्वी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘रावण कदम’च्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

You might also like
Comments
Loading...