कशी जमवली महानगर पालिकेच्या अधिकाऱ्याने असंपदा?

एसीबीने कसे काढले शोधून

अभय निकाळजे (वरिष्ठ पत्रकार) औरंगाबाद : औरंगाबाद महानगर पालिकेच्या निलंबित शाखा अभियंत्यावर मिळकतीपेक्षा जास्त ‘कमाई’ केली म्हणून गुन्हा दाखल केला. ही रक्कम आहे, १२ लाख २४ हजार ९०१ रूपये एवढी. पण हे ‘अॅन्टी करप्शन ब्युरो’ने (एसीबी) कसे काढले असेल शोधून?

तर एखाद्या शासकीय, नियम शासकीय, शासनाची महामंडळे, अशा ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संदर्भाने ही चौकशी केली जाते. त्यामध्ये शासनाच्या अनुदानीत संस्थांचाही समावेश होतो. तर या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाच्या तिजोरीतून होते. त्यामुळे त्याला मिळणाऱ्या वैध उत्पन्नाची माहीती, तो अधिकारी किंवा कर्मचारी ज्या विभागात काम करतो, तिथून मिळू शकते. म्हणून ‘एसीबी’ त्यांच्या विरूद्ध चौकशी करू शकते. तर महानगर पालिकेचे निलंबित शाखा अभियंता बाबुलाल गायकवाड यांनी मिळकतीपेक्षा जास्त मालमत्ता जमवली असल्याची तक्रार एसीबीला तीन वर्षापुर्वी केली होती. त्याची चौकशी सुरू होती. त्यामध्ये एसीबीने काय-काय शोधून काढले.

३० जून १९८३ ला गायकवाड महानगर पालिकेत नोकरीला लागला. तिथपासून ते ११ मार्च २०१५ पर्यत त्या किती पगार महानगर पालिकेने दिला. हे रितसर म्हणजे शासकीय सोपस्कारपुर्ण करून एसीबीने महानगर पालिकेकडूनं माहीत करून घेतले. त्यांच्या या ३२ वर्षाच्या नोकरीत जेवढ्या रक्कमेचा पगार त्यांना मिळाला, त्यातील ३३% रक्कम ही त्यांनी घरखर्चासाठी वापरली. असे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्टॅर्ण्डड फाॅर्मेटनुसार गृहीत धरले. उर्वरीत खर्च म्हणजे मुला-मुलींच्या शिक्षणाचा, वाहन किंवा इतर खरेदीचा, हप्ते त्यामध्ये एलायसी, बँक, पतसंस्था हे सगळे अधिकृत माहीती घेऊन केले जाते. त्यानंतरही काही रक्कम किंवा खरेदी केलेल्या वस्तू त्यामध्ये दिसत असतील तर ती असंपदा म्हणून गृहीत धरली जाते. तशी बाबूलाल गायकवाड यांच्याकडे १२ लाख २४ हजार ९०१ रूपयांची अतिरिक्त संपत्ती एसीबीला आढळली. त्यातून गुरूवारी गुन्हा दाखल झाला आहे.