नोटंबदीनंतर ५६ कोटी करदाते वाढले – देवेंद्र फडणवीस

cm devendra fadanvis

टीम महाराष्ट्र देशा –  नोटंबदीनंतर ५६ कोटी करदाते वाढले आहेत. नोटबंदीमुळे जनजागृती झाल्याने हे शक्य झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केलाय. नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लावण्याबाबत कधीतरी विचार करावा लागणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त आज भाजपकडून देशभरात ‘काळा पैसा विरोधी दिवस’ साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद घेतली. कर लावण्यासंदर्भात कुठेतरी लवचिकता असावी आणि राज्याचं उत्पन्न घटलंच तर कुठेतरी भरपाई करता यावी यासाठीच सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी पेट्रोल आणि मद्यावर जीएसटी लावण्यास विरोध केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तर दुसरीकडे बँकेत आलेल्या काळ्या पैशावर करवसुली सुरु आहे, नोटाबंदीमुळे ‘कॅशलेस इकोनॉमी’कडे वाटचाल सुरु आहे. कॅशलेस व्यवहार हे नोटाबंदीचं यश, असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी साडेपंधरा लाख कोटी रुपयांची माहिती आपल्याकडे नव्हती. हे पैसे कोणाकडे आहेत आणि त्याचा उपयोग कशाप्रकारे होत आहेत, याची कोणतीही नोंद नव्हती. मात्र, नोटाबंदीमुळे असंघटित अर्थव्यवस्थेतील पैसा संघटित अर्थव्यवस्थेतील बँकिंग क्षेत्रात आला. नोटाबंदीमुळे हे शक्य झाल्याचे ते म्हणालेत