सरकारला शेवगावमधील आंदोलन दडपवायचे होते म्हणून….- विखे पाटील

radha krushn vikhe patil leader of opposition

टीम महाराष्ट्र देशा – जाणिवपूर्वक बळाचा वापर करुन शेतक-यांचे आंदोलन चिरडू शकतो, असा सरकारचा विचार होता. त्यामुळेच शेवगाव तालुक्यातील शेतक-यांवर गोळीबार करण्याचा प्रकार घडला, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली.

ऊस दरावरुन चिघळलेल्या आंदोलनातील शेतक-यांवर बुधवारी (दि. १५) पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. यात जखमी झालेल्या शेतक-यांवर नगरमधील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गुरुवारी दुपारी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी जखमींची हॉस्टिपलमध्ये जाऊन भेट घेतली.
विखे म्हणाले, शेतक-यांवर गोळीबार करणे चुकीचे आहे.

निंदनीय आहे. हे प्रशासनाचे अपयश आहे. सांगलीत पोलीस कोठडीत एका आरोपीचा मृत्यू झाला. हे गृहखात्याचे अपयश आहे. गृहखाते प्रभारी असल्यामुळेच राज्याला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. जाणिवपूर्वक बळाचा वापर करुन शेतक-यांचे आंदोलन चिरडू शकतो, असा सरकारचा विचार होता. त्यामुळेच हा प्रकार घडला. जिल्ह्याचा पालकमंत्रीही याची दखल घेत नाही. शासनाच्या संवेदनाच हरवल्या आहेत. कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटले. मात्र शेतक-यांचे कर्ज माफ झालेच नाही.

शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे. रोज सरकार योजनांच्या घोषणा करीत आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळेच कालची घटना घडली.एफआरपीप्रमाणे कारखान्यांनी भाव देणे बंधनकारक आहे. जे कारखान्याचे याचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. पण सरकार काही करीत नाही. एफआरपीपेक्षा जास्त भाव देण्याची मागणी होत आहे. रंगराजन समितीच्या शिफारशींनुसार दर द्यावा. पण सरकार हे करीत नाही.