कर्जमाफी : शिवसेनेचा भाजपवर भरोसा नाय काय ?

subhas desai vs cm

टीम महाराष्ट्र देशा – राज्यातील किती शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीची रक्कम मिळाली, याबद्दल सरकारच्या वतीने वेळोवेळी जाहीर करण्यात येत असलेल्या आकडेवारीवर अविश्वास व्यक्त करीत, अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहत असल्याचा टीकेचा सूर शिवसेनेच्या मंत्र्यांनी लावला. शिवसेनेने जमा केलेल्या आकडेवारीशी सरकारची आकडेवारी ताडून पाहिली जाईल, असे शिवसेनेचे नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

मंत्रालयात मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, शेतकरी कर्जमाफीचा आढावा घेण्याची मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली. राज्य शासनाकडून कर्जमाफीसाठी आतापर्यंत १७ लाख ४९ हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे १० हजार ३३२ कोटी रुपये बँकांकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यापैकी नऊ लाख ४३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर पाच हजार १४१ कोटी रुपये बँकांनी जमा केल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जाहीर केली आहे.

राज्याच्या सत्तेत भाजपबरोबर सहभागी असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांचा मात्र ‘सरकारी आकडेवारीवर भरोसा नाही,’ असाच सूर होता. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या आकडेवारीबद्दल शंका उपस्थित केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना बँकांमध्ये जाऊन किती शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळते, याची माहिती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तालुकातालुक्यांमधून माहिती जमा करण्यात आली आहे. त्यातून अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली आकडेवारी शिवसेनेने संकलित केलेल्या आकडेवारीशी ताडून पाहिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीचा आढावा सादर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. यावरून शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारकडून देण्यात येणाऱ्या माहितीवर किंवा आकडेवाडीवर शिवसेनेच्या मंत्र्यांचा भरोसा नाही, असे त्यांनी सूचित केले.