छ. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकास १३ विभागांच्या परवानग्या

टीम महाराष्ट्र देशा –  मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणेसाठी आत्तापर्यंत १३ विभागाच्या परवानग्या मिळाल्या असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ महिन्यांपूर्वी या स्मारकाचे जलपूजन केल्यापासून आतापर्यंत यावर १५ कोटी ८२ लाख ८० हजार ११ रूपये खर्च झाले असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प विभागाने दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प विभागाचे उप अभियंता विजय जेथ्रा यांनी अनिल गलगली यांस उपलब्ध करुन दिलेल्या कागदपत्रात १३ विभागांचे ना- हरकत प्रमाणपत्र आणि त्यांसकडून झालेल्या खर्चाची माहिती देण्यात आली आहे.

ज्या १३ विभागांनी ना-हरकत प्रमाणपत्र दिली आहेत त्यात नेव्ही, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मेरिटाईम बोर्ड, बीएनएचएस इंडिया, मत्स्य व्यवसाय विभाग, कोस्ट गार्ड पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त, वन आणि पर्यावरण विभाग, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड, मुंबई महानगरपालिका आयुक्त, बेस्ट महासंचालक, एअरपोर्ट ऑथोरिटी, एव्हिएशन ऑथोरिटी ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ डिसेंबर २०१६ रोजी प्रकल्पस्थळी जलपूजन कार्यक्रम करण्यात आला होता.

त्यावेळी एमएमआरडीएने हा खर्चाचा भार सोसला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सततच्या तगादानंतर ५ कोटी ५४ लाख अदा केले आहेत. यामध्ये २ कोटी ५४ लाख सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आले आहेत. कला दिग्दर्शक नितीन देसाईच्या एनडी आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीस ३ कोटी देण्यात आले आहेत . नितीन देसाई यांनी आगाऊ रक्कम घेत काम केले.

एमएमआरडीए प्रशासनाने पंतप्रधान यांच्या हस्ते होणा-या भूमीपूजन कार्यक्रमामध्ये अडचणी येऊ नयेत म्हणून सर्व शिफारशी मान्य केल्या आहेत. परंतु आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने उपयोगिता प्रमाणपत्र दिलेच नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने ईजीआयएस इंडिया कन्स्ट्रकॅशन या कंपनीस १० कोटी १८ लाख १० हजार १७७ इतकी रक्कम दिली. तसेच देशमुख कन्स्ट्रकॅशन कंपनीस १० लाख ६९ हजार,८३४ एवढी रक्कम दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ महिन्यांपूर्वी या स्मारकाचे जलपूजन केल्यापासून आतापर्यंत यावर एकूण १५ कोटी,८२ लाख,८० हजार ११ रूपये खर्च झाले आहेत

You might also like
Comments
Loading...