भाजप-सेनेचा काडीमोड झाला तरीही…..- पवार

का पवार करीत आहे महाराष्ट्र दौरा. जाणून घ्या सविस्तर

टीम महाराष्ट्र देशा – शरद पवारांच्या दौऱ्यांचे प्रयोजन काय? असे  प्रश्न पत्रकार पवारांना विचारत आहेत. त्याची नोंद घेत खा. पवार म्हणाले, ‘पत्रकाराने दौऱ्याचे कारण उपस्थित केले. पत्रकार त्यांच्यापरीने निष्कर्ष काढतात. तसे काढायला ते मोठेच असतात. पण आमचा उद्देश लोकांशी संवाद साधण्याचा, संघटना बांधण्याचा, कार्यकर्त्यांत ऊर्जा निर्माण करण्याचा असतो. ते मी करतो. भाजप-सेनेचा काडीमोड झाला तरीही आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही, असे ते म्हणाले.शरद पवार सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी उभे राहण्याबाबत धोरण तयार करण्याची जबाबदारी शासनाची असते. पण शेतकऱ्यांच्या मदतीस राज्य धावून आल्याचे दिसत नसल्याने पक्ष आंदोलन उभारणार आहे. विधानसभा चालू देणार नाही, राज्य चालू देणार नाही, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ११ डिसेंबरच्या मोर्चाचे स्वरूप स्पष्ट करताना केली.

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे यमुना लॉनमध्ये शनिवारी दुपारी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात बोलताना पवार यांनी राज्य व केंद्र शासनावर टीकास्त्र सोडले. केंद्र व राज्य सरकारने एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही, असे प्रारंभीच स्पष्ट करीत पवार म्हणाले, राज्यातील सर्वच भागात मी फिरत आहे.