कोथळे प्रकरणी नांगरे पाटलांची देखील चौकशी करणार – दीपक केसरकर

dipak kesarkar and nagare patil

टीम महाराष्ट्र देशा – सांगलीत पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचीही चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी येथे दिली.

पोलीस यंत्रणेवर विश्वासच उरलेला नसल्याने कोठडीत करण्यात आलेल्या अनिकेतच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविला जावा, अशी मागणी कुटुंबीयांनी रविवारी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. अनिकेतच्या हत्येला जबाबदार असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह अन्य दोषींवर कारवाई झाली नाही तर कुटुंब पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करेल, असा इशाराही त्यांनी दिला. केसरकर यांनी अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांची रविवारी भेट घेतली.

ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर निश्चित कारवाई करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी विश्वास नांगरे-पाटील आणि दत्तात्रय शिंदे यांच्या बदली आणि राजीनाम्याची मागणी होत आहे. याप्रश्नी शिवसेनेने जोरदार आंदोलन केले होते. त्यावर बोलताना केसरकर यांनी या दोघांचीही चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले. सर्व पक्षांतील नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे हा खटला द्रुतगती न्यायालयात चालवला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.